Bigg Boss 19 Contestant : छोट्या पडद्यावरील लोकप्रिय शो ‘बिग बॉसचा १९ वा सीझन नुकताच सुरू झाला आहे. अभिनेता सलमान खान हा शोचं सूत्रसंचालन करत आहे. यावेळी शोमध्ये अनेक प्रसिद्ध अभिनेते आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्सनी प्रवेश केला आहे. त्यापैकीच एक म्हणजे तान्या मित्तल…

ग्वाल्हेरची उद्योजिका, इन्फ्लुएन्सर आणि मॉडेल म्हणून लोकप्रिय असलेली तान्या मित्तल सध्या ‘बिग बॉस १९’मधील सर्वात चर्चेतील स्पर्धकांपैकी एक ठरली आहे. तिचं घरातील वागणं, बोलणं आणि मतं सोशल मीडियावर सतत व्हायरल होत आहेत. व्यवसायाबद्दलच्या काही योजना असोत किंवा तिच्या लाइफस्टाइलबद्दल ती सतत या शोमध्ये बोलताना दिसत आहे.

अलीकडेच, नीलम गिरी आणि नग्मा मिराजकरबरोबरच्या संवादात तिने बोलताना तिच्या भविष्यातील स्वप्नांबद्दल सांगितलं. यावेळी तिने तिला भारतातील ‘टॉप १०० उद्योजकां’मध्ये स्वत:ला पाहायचं असल्याचं म्हटलं. तसंच, तिला पुढे जाऊन राजकारणात जायचंय असंही सांगितलं.

मात्र, तिच्या या वक्तव्यावर घरातील सदस्यांनी फारसं लक्ष दिलं नाही आणि मजेत म्हणाले की, ती दर पाच मिनिटांनी तिचं करिअर बदलते. याचदरम्यान, एका प्रसंगात तान्या आईची आठवण काढत भावूक झाली. घरातली कामं करुनही कोणी तिचं कौतुक करत नाही, असं ती म्हणाली. तिच्या मते, ती कितीही प्रयत्न करत असली तरी घरातील इतर सदस्य तिला समजून घेत नाहीत.

तिने कॅमेऱ्याकडे बघून आईला सांगितलं की, ‘ती लवकरच घरी येणार आहे… फक्त तीन महिन्यांत!’ तिचे हे भावनिक क्षण प्रेक्षकांसाठी मजेशीर ठरले आहेत. या सीनवर शोचे अनेक चाहते प्रतिक्रिया देत आहेत. तसंच ‘बिग बॉस’ची विजेती गौहर खानने तिच्या इन्स्टाग्रामवर तान्याचा व्हिडीओ शेअर करत “तीन महिन्यांत लवकरच घरी येईन – हाहाहा. ‘बिग बॉस १९’मध्ये हिला दुर्लक्षित करणं शक्यच नाही!” असं म्हटलंय.

दरम्यान, तान्या मित्तल ही ‘बिग बॉस १९’मधील श्रीमंत स्पर्धक असल्याच्या चर्चा होताना दिसत आहेत. प्रीमिअरच्या भागात तान्याने खुलासा केला होता की, ती ‘बिग बॉस १९’च्या घरात ५०० पेक्षा जास्त साड्या, ५० किलो दागिने आणि स्वतःचे चांदीचे भांडे व बाटली घेऊन आली आहे. विशेष म्हणजे, ‘बिग बॉस’च्या इतिहासात ती एकमेव स्पर्धक आहे; जिने स्वतःची भांडी घरात नेण्याची परवानगी मिळवली आहे.