मराठी टेलिव्हिजन क्षेत्रातील काही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक अभिनेत्री म्हणजे जान्हवी किल्लेकर (Jahnavi Killekar). जान्हवी आजवर अनेक मालिकांमधून प्रेक्षकांच्या भेटीस आली आहे. सध्या ती अबोली या मालिकेत पाहायला मिळत आहे. तिची ‘भाग्य दिले तू मला’ मालिकेतील खलनायिका विशेष गाजली. त्यानंतर तिने ‘बिग बॉस मराठी’चं पाचवं (Bigg Boss Marathi 5) पर्वही चांगलंच गाजवलं. आपल्या अभिनयाने चर्चेत राहणारी ही अभिनेत्री सध्या तिच्या आजारपणाच्या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.

जान्हवीने ‘आम्ही असं ऐकलंय’ या पॉडकास्टमध्ये तिच्या आजारपणाविषयी सांगितलं. जान्हवीच्या मेंदूत रक्ताच्या गुठळ्या होत्या आणि त्या काळात तिची अवस्था कशी होती? याबद्दल तिनं सविस्तर सांगितलं आहे. त्या संदर्भात बोलताना जान्हवी असं म्हणाली, “हो हे खरं आहे. ईशानच्या जन्मानंतर तो दीड महिन्याचा असताना हे झालं. मी किचनमध्ये असताना माझं शरीर अचानक उडायला लागलं. उजव्या बाजूचं शरीर अचानक उडायला लागल्याचं मला जाणवू लागलं. म्हणजे मला कळतच नव्हतं की, माझ्याबरोबर हे काय होत आहे. मी माझा पाय पकडला; पण शरीर उडतच होतं.

त्यानंतर जान्हवीनं पुढे सांगितलं, “मी सगळ्यांना फक्त हाका मारत होते आणि मी सगळ्यांना मला काही तरी होतंय इतकंच सांगत होते. डोक्यात खूप मुंग्याही येत होत्या आणि मी बेशुद्ध झाले. त्यानंतर मला जेव्हा जाग आली. तेव्हा माझे सासरे माझ्या डोक्याजवळ बसले होते. सासू आणि नवरा पायाजवळ होते. जाऊबाई… असे सगळे सगळे माझ्याजवळच बसले होते. मला शुद्ध आल्यानंतर पुन्हा मुंग्या सुरू झाल्या. तेव्हा मी सगळ्यांना फक्त इतकंच सांगत होती की, मला वाचवा… मला वाचवा… म्हणजे मला असं वाटलेलं की, मी गेलेच… मी संपलेच… मी मेलेच…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पुढे तिने म्हटलं, “मला कळतच नव्हतं की, हे मला काय होतंय आणि पुन्हा मुंग्या येणं सुरू झालं. मी पुन्हा मला वाचवा… मला वाचवा… म्हणून ओरडत होते. मला मरायचं नाही, असं म्हणत होते आणि मी पुन्हा बेशुद्ध झाले. त्यानंतर मला सहा दिवसांनी शुद्ध आली. तेव्हा मी आयसीयूमध्ये होते. तेव्हा ईशान अगदीच दीड महिन्याचा लहान बाळ होता आणि मला कळलं की, मी इतके दिवस त्याच्यापासून लांब आहे. तेव्हा मी खूप खूप रडले. मला असं झालं की, ते इतकं लहान बाळ काय करत आहे? ते कुणाबरोबर आहे? ते दूध कसं पित आहे. कारण- तो तेव्हा आईचं दूध पित होता”.