Kiku Sharda In Rise and Fall : अॅमेझॉन प्राईम व्हिडीओवर ‘राइज अँड फॉल’ (Rise and Fall) हा नवा शो सुरू झाला आहे. ‘शार्क टँक’फेम अशनीर ग्रोव्हर या शोचं सूत्रसंचालन करीत आहेत. अभिनेते, डान्सर, पत्रकार, कॉमेडियन अशा काही क्षेत्रांतील एकूण १५ जण या शोमध्ये सहभागी झाले आहेत आणि त्यांची एकमेकांविरोधात त्यांची स्पर्धा असणार आहे.
नुकताच हा शो सुरू झाला असून, अनेक रिअॅलिटी शो गाजवलेला, तसेच ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वातून आणखीनच प्रसिद्धीझोतात आलेला अरबाज पटेलही सहभागी झाला आहे. ‘बिग बॉस मराठी ५’ मध्ये अरबाज व निक्की तांबोळी या जोडीची चांगलीच चर्चा झाली होती.
‘बिग बॉस मराठी’मध्ये केलेल्या राड्याने, तर अरबाज हे नाव लक्षात राहिलं. अशातच त्याची नुकत्याच सुरू झालेल्या ‘राइज अँड फॉल’ या शोमध्येही चर्चा सुरू आहे. या शोमध्ये विनोदी अभिनेता किकू शारदाही सहभागी झाला आहे. नुकतंच अरबाजने किकूवर टीका केली. तसेच किकूकडे काम नसल्याने तो इथं आल्याचंही म्हटलं.
अरबाजनं किकूवर त्याचा द्वेष करण्याचा आरोप केला आणि म्हटले, “जेव्हा लोक तुमच्या पाठीमागे बोलतात, तेव्हा याचा अर्थ असा की, तुम्ही आधीच त्यांच्यापुढे आहात. मी इथे माझा गेम खेळण्यासाठी आणि माझ्या पद्धतीनंच पुढे जाणार. बाहेरचं कोणीही मला अडवू शकत नाही.”
त्याव्यतिरिक्त, अरबाजनं किकू शारदावर टीका करत म्हटलं, “किकू शारदा या शोमध्ये सहभागी झाले; कारण- त्यांच्याकडे दुसरं कोणतंही काम नव्हतं. त्यांनी अचानक टीव्ही व अभिनय सोडला आणि इथे आले. ते पूर्वी कधीच रिअॅलिटी शोचा भाग नव्हते. त्यामुळे असं वाटतंय की, ते जणू काही जबरदस्तीनं इथे आले आहेत आणि म्हणूनच त्यांच्या मनात माझ्याबद्दल द्वेष आहे.”
दरम्यान, अलीकडेच, ‘द ग्रेट इंडियन कपिल शो’मधून किकूनं एक्झिट झाल्याची बातमी आली होती. त्यामुळे अनेक चाहते नाराज झाले. अनेकांना वाटलं की, किकू शारदानं शो सोडला आहे. अशनीर ग्रोवरच्या ‘राइज अँड फॉल’मध्ये भाग घेण्यासाठी आणि कृष्णा अभिषेकबरोबर झालेल्या मतभेदांमुळे किकूनं ‘द ग्रेट इंडियन कपिल शो’मधून काढता पाय घेतला.
मात्र, किकू शारदानं स्वतः आपल्या इन्स्टाग्रामवर कृष्णा अभिषेकबरोबरचा एक फोटो शेअर करीत या चर्चांना पूर्णविराम दिला. त्यानं लिहिलं, “हे नातं… कधीच तुटणार नाही! आमचं भांडण म्हणजे फक्त एक गंमत होती. या सगळ्या अफवांवर विश्वास ठेवू नका. मी ‘द ग्रेट इंडियन कपिल शो’ सोडला आहे; पण मी कायम या शोचा आणि या कुटुंबाचा भाग राहीन. त्यामुळे अफवांवर विश्वास ठेवू नका.”