Ghanshyam Darwade React On Nishikant Dubey : गेल्या काही दिवसांपासून राज्यात मराठी-हिंदी असा भाषिक वाद सुरू असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. त्यातच भाजपा खासदार निशिकांत दुबे यांनी या वादात मराठी लोकांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं. त्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावरही टीका केली होती. मीरा-भाईंदरमध्ये परप्रांतीय व्यापाऱ्याला मारहाण झाल्यानंतर निशिकांत दुबे यांनी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला.
यावेळी त्यांनी “हिंदी भाषिकांना मुंबईत मारहाण करणाऱ्यांनो तुमच्यात हिंमत असेल तर महाराष्ट्रात उर्दू भाषिकांना मारून दाखवा. तुम्ही फक्त आमच्या पैशांवर जगत आहात. तुम्ही कोणता कर भरता? आणि तुमच्याकडे कोणते उद्योग आहेत? आमच्याकडे अनेक खाणी आहेत”, असं वक्तव्य केलं होतं. यानंतर त्यांच्यावर राजकीय स्तरातून टीका करण्यात आली. त्याचबरोबर मराठी विश्वातूनही अनेकांनी त्यांना सुनावलं होतं.
चिन्मयी सुमित यांनी त्यांना खडेबोल सुनावले होते. अशातच ‘बिग बॉस मराठी’ फेम छोटा पुढारी म्हणजेच घन:श्याम दरवडेनंही निशिकांत दुबे यांच्यावर टीका केली आहे. घन:श्याम सोशल मीडियावर कायमच सक्रिय असतो. सोशल मीडियावर तो सामाजिक आणि राजकीय विषयांवरील व्हिडीओ शेअर करत त्याची प्रतिक्रिया व्यक्त करत असतो. अशातच त्याने निशिकांत दुबे यांच्यावरही व्हिडीओद्वारे निशाणा साधला आहे.
घनश्याम दरवडे इन्स्टाग्राम पोस्ट
या व्हिडीओमध्ये निशिकांत असं म्हणतो, “समाजात प्रसिद्ध होण्यासाठी लोकांना पदाचं भान राहत नाही. झारखंडचा भाजपा खासदार निशिकांत दुबे म्हणतात की, महाराष्ट्रात भाकरीची पंचाइत आहे, आम्ही त्यांना भाकरी देतो. आमच्यामुळे ते लोक जगतात आणि आम्ही अधिक टॅक्स भरतो असं त्यांचं म्हणणं आहे; तर त्यांना मी सांगतो की, १०० रुपये टॅक्स असेल तर त्यापैकी ३८ रुपये टॅक्स महाराष्ट्रातून जातो, हे ध्यानात ठेवा. महाराष्ट्र हा शेतकऱ्यांचा आहे. आम्ही जर पिकवलं नाही तर तुम्ही उपाशी राहाल, त्यामुळे शब्द जपून वापरा.”
यानंतर तो असं म्हणतो, “तुमचा झारखंड किंवा कोणीही असेल, आमच्या महाराष्ट्राच्या पुढे टिकू शकणार नाही. आम्हाला मराठीचा गर्व नाही तर माज आहे. तुम्ही आम्हाला म्हणता की, महाराष्ट्रातील लोक बाहेर आले तर त्यांचं जगणं कठीण करू; अरे पण आम्हाला आमच्या महाराष्ट्रातून बाहेर जायची गरजच नाही. आमच्याकडे अनेक उद्योग-धंदे आहेत, तुम्हीच आमच्या महाराष्ट्रात येता. मराठी म्हणून एक विनंती – युती करणं गरजेचं आहे.”
याशिवाय व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये घन:श्यामने त्यांना “अरे भारताचा ३५ टक्के टॅक्स आम्ही भरतो. तुमच्या राज्याला निधी आमच्या टॅक्समुळे मिळतो. आमच्या एका महापालिकेचे उत्पन्न तुमच्या राज्याचे उत्पन्न आणि तुम्ही आम्हाला बोलणार?” असा थेट प्रश्नही उपस्थित केला आहे. दरम्यान, घन:श्यामने शेअर केलेल्या या व्हिडीओवर अनेकांनी त्यांच्या वक्तव्यावर संमती दर्शवली आहे. “बरोबर बोललात”, “अगदी योग्य” अशा प्रतिक्रिया या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी व्यक्त केल्या आहेत.