Dhananjay Powar Answers Fan Questions : ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वात अंकिता वालावलकर आणि धनंजय पोवार यांची मैत्री चांगलीच गाजली होती. हे दोघं एकमेकांना बहीण-भाऊ मानतात. ‘बिग बॉस’च्या घरातील प्रवास संपला असला तरी हे दोघे कायमच एकमेकांच्या संपर्कात आहेत. दोघे अधूनमधून एमकेकांना भेटतात आणि या भेटीचे खास क्षण ते आपल्या चाहत्यांबरोबर शेअर करत असतात.

अंकिता आणि डीपी सोशल मीडियावरही चांगलेच सक्रिय असतात. सोशल मीडियाद्वारे ते आपल्या कामाबद्दलची माहिती शेअर करीत असतात. तसेच अनेकदा सोशल मीडियाद्वारे चाहत्यांशी संवादही साधतात. अशातच डीपीने त्याच्या इन्स्टाग्रामद्वारे चाहत्यांशी संवाद साधला. डीपीने नुकतेच QnA सेशन केले. त्याद्वारे त्याने चाहत्यांच्या काही प्रश्नांची उत्तरे दिली. यावेळी एका चाहत्याने त्याला रक्षाबंधनबद्दल प्रश्न विचारला.

भाऊ आणि बहिणीच्या पवित्र नात्याचं प्रतीक असलेला रक्षाबंधन हा सण अवघ्या काही दिवसांवर आला आहे. ९ ऑगस्ट रोजी हा सण साजरा केला जाणार आहे. त्याच रक्षाबंधननिमित्त एका चाहत्याने डीपीला अंकिताबद्दल प्रश्न विचारला. अंकिता-धनंजय हे एकमेकांना भाऊ-बहीण मानतात आणि या नात्याबद्दल ते अनेकदा बोलले आहेत. त्यामुळे यंदाच्या रक्षाबंधननिमित्त डीपी अंकिताला काय गिफ्ट देणार, असा प्रश्न चाहत्याने विचारला.

या प्रश्नाचं उत्तर डीपीनं त्याच्या खास शैलीत दिलं आहे. ‘बिग बॉस’च्या घरात डीपीचा कायमच गमतीशीर स्वभाव पाहायला मिळाला. याच गमतीशीर स्वभावात त्यानं चाहत्याच्या प्रश्नाचं उत्तर दिलं आहे. डीपीनं त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये तो काही वेळ कॅमेऱ्याकडे बघतो अन् मध्येच थांबण्याचा अभिनय करतो. इंटरनेट बंद झाल्यानंतर व्हिडीओ कॉलवरील संभाषण अचानक थांबतं; तसे त्यानं या व्हिडीओत केलं आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
धनंजय पोवार इन्स्टाग्राम स्टोरी
धनंजय पोवार इन्स्टाग्राम स्टोरी

स्वत:च्या या अभिनयाला त्यानं इंटरनेटचा प्रॉब्लेम असल्याचं म्हटलंय. या व्हिडीओवर त्यानं “हे असं इंटरनेट कधीही गंडतय” असं म्हटलं आहे. आता रक्षाबंधनच्या प्रश्नाचं उत्तर देताना डीपीनं व्हिडीओमधून जे उत्तर दिलं आहे, त्यावर अंकिता काय प्रतिक्रिया देते? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. दरम्यान, ‘बिग बॉस’मध्ये अंकिता धनंजयला प्रेमानं ‘डीपीदादा’ अशी हाक मारायची. त्यामुळे केवळ शोमध्ये नव्हे; तर खऱ्या आयुष्यातही डीपी अंकितासाठी भावाची भूमिका पार पाडत आहे, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.