‘प्राडा’नंतर कोल्हापूर एका कारणाने पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे आणि या चर्चेचं कारण म्हणजे महादेवी हत्तीण. गेले काही दिवस सोशल मीडियासह सर्वच माध्यमांमध्ये महादेवी हत्तीणीबद्दल चर्चा सुरू आहे. ३५ वर्षे शिरोळमधील नांदणी गावात असणारी ही महादेवी हत्तीण गुजरातकडे रवाना झाली आहे.
पण या महादेवी हत्तीणीला आता पुन्हा कोल्हापुरात आणण्यासाठी सगळेजण आवाज उठवताना दिसत आहेत. महादेवी गुजरातच्या वनतारामध्ये गेल्यानंतर कोल्हापुरच्या अनेकांनी जिओ सिमवर बहिष्कार टाकला आहे. अनेकांनी जिओचा सिमकार्ड पोर्ट केलं आहे. अशातच बिग बॉस मराठी फेम धनंजय पोवारनेही महादेवी हत्तीणीसाठी सोशल मीडियावर आवाज उठवला आहे.
धनंजय पोवारने पुन्हा एकदा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये तो म्हणतो, “आम्ही पश्चिम महाराष्ट्रातले लोक, आम्ही गावकरी लोक म्हणजे काय आहोत हे आता दाखवणार. आमची माधुरी आम्हाला परत हवीय. ते आमचं ध्येय आहे. तिला आणल्याशिवाय आता माघार नाही. आपण त्यांचे अनेक कनेक्शन पोर्ट केलेत. माझ्या माहितीनुसार, साडेसहा हजार लोकांनी सिम पोर्ट केलं आहे; पण त्यांच्यापर्यंत ही माहिती अजून पोहोचली नाही. म्हणजे आपला आकडा कमी आहे, एखाद्याला जाणवेल इतका तो आकडा नाहीय. याचा अर्थ असं नाही की आपण ते थांबवायचं. मीसुद्धा माझं सिम पोर्ट केलंय.”
यापुढे तो सांगतो, “एक सिम कार्ड पोर्ट केलं आणि त्यामुळे त्यांना तोटा होईल असं नाही. कारण त्यांचं उत्पन्न फक्त रिचार्जच्या पैशांवर नाही. त्यांना जाहिरातीमधून पैसे मिळतात. माझे जसे १५ लाख फॉलोअर्स आहेत. त्यांच्यामुळे मी वेगवेगळ्या गोष्टी करत आहे, तसंच त्यांच्यापासून काही लोक कमी करायचे आहेत आणि ते झालं की त्यांच्या जाहिरातीचा दर कोसळणार. मग त्यांना एका माणसाकडून दर महिन्याला तीन हजारांचं नुकसान होणार.”
धनंजय पोवार इन्स्टाग्राम व्हिडीओ
यापुढे तो म्हणतो, “तुम्ही त्यांचे सगळे कनेक्शन्स बंद कराल; तेव्हा त्यांना एका कनेक्शनमागे २० ते २२ हजारांचं नुकसान होऊ शकतं. त्यांना उत्पन्न मिळवून देणाऱ्या सगळे मार्ग आपल्याला रोखायचे आहेत, कारण त्यांनी आपल्या भावना दुखावल्या आहेत. आमची अस्मिता ते घेऊन गेले आहेत आणि ती आम्हाला परत हवी आहे.”
यानंतर तो सर्वांना आवाहन करत असं म्हणतो, “आता थांबायचं नाही, जोपर्यंत माधुरी परत येत नाही, तोपर्यंत थांबायचं नाही. तुम्ही आमची भावना समजून घ्या, आमची महादेवी/माधुरी आम्हाला परत द्या. माझी महाराष्ट्रातील प्रत्येक व्यक्तीला विनंती आहे की, आमच्या महादेवीसाठी आम्हाला पाठिंबा द्या.”