Dhananjay Powar On Online Gaming Bill : ऑनलाइन गेमिंगला आता कायद्याचा चाप बसणार आहे. सरकारने ऑनलाइन गेमिंगला नियंत्रित करणारे महत्त्वाचे विधेयक लोकसभेत मंजूर केले आहे. या विधेयकाचा मुख्य उद्देश ऑनलाइन मनी गेम्स आणि सट्टेबाजीवर बंदी घालणे हा आहे.
केंद्र सरकारने ऑनलाइन गेमिंगमुळे लोकांना होणारे आर्थिक आणि सामाजिक नुकसान थांबवण्यासाठी ‘प्रमोशन अँड रेग्युलेशन ऑफ ऑनलाइन गेमिंग बिल, २०२५’ हे विधेयक आणले आहे. माहितीनुसार, ऑनलाइन सट्टेबाजी असणार्या ॲप्सच्या जाहिरातींना प्रोत्साहन देण्यासारख्या कृत्यांसाठी या विधेयकात दंड आणि शिक्षेचीही तरतूद आहे.
ऑनलाइन मनी गेम्स ही समाजासाठी एक मोठी समस्या आहे. यामुळे आत्महत्या आणि हिंसक हल्ल्यांच्या अनेक बातम्या आल्या आहेत. तसंच फसवणूक आणि गैरव्यवहारामुळे अनेक कुटुंबं उद्ध्वस्त झाली आहेत. याच पार्श्वभूमीवर सरकारने ऑनलाइन गेमिंगविरुद्ध कायदा आणला असून या गैरप्रकरांना यामुळे चाप बसू शकतो.
सरकारच्या या निर्णयावर अनेक प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत. अशातच ‘बिग बॉस मराठी ५’ फेम धनंजय पोवारने या निर्णयावर आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आलेल्या व्हिडीओमध्ये धनंजय पोवार म्हणतो, “कष्ट… कष्ट… लोकांचं उष्ट खायचं नाही. कष्ट करून पोट भरून खायचं.” यापुढे तो आनंद व्यक्त करत “सरकारच्या या निर्णयाचं मी टाळ्या वाजवत स्वागत करतो. पहिल्यांदा मला कुठला तरी निर्णय आवडला आहे” असं म्हटलंय.
पुढे त्याने ऑनलाइन गेमिंगच्या जाहिराती करणाऱ्यांबद्दल “आता पुन्हा ऑनलाइन गेमिंगच्या जाहिराती करणार का?” असं म्हटलंय. नंतर तो आपल्या खास कोल्हापुरी भाषेत “आता काम करायला लागतंय. काम केलं की, घाम येतो आणि घाम गाळला की, दाम मिळतं. बसून मिळालेलं दाम, त्यावर राहायचं नाही ठाम… कारण आता हे सरकार घ्यायला आलंय तुमचं काम… तीन वर्षांची शिक्षा आणि एक कोटींचा दंड… सुपला शॉट…” असं म्हणतो.
धनंजय पोवार इन्स्टाग्राम व्हिडीओ
धनंजय हा सोशल मीडियावर कायमच त्याच्या मजेशीर अंदाजातले व्हिडीओ शेअर करत असतो. त्याचे हे व्हिडीओ चाहत्यांच्याही चांगलेच पसंतीस पडतात. अशातच त्याने सरकारच्या ऑनलाइन गेमिंगच्या निर्णयावरसुद्धा आपल्या खास खुमासदार शैलीत प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
दरम्यान, धनंजयने शेअर केलेल्या या व्हिडीओवर चाहत्यांनीसुद्धा त्याचं कौतुक केलं आहे. ऑनलाइन गेमिंगच्या निर्णयाला विरोध केल्याबद्दल त्याचे अनेक चाहते कौतुक करत आहेत.