मनोरंजन क्षेत्राविषयी अनेकांना कायमच आकर्षण असतं. त्यामुळे या इंडस्ट्रीमधील कलाकारांच्या वैयक्तिक आयुष्याविषयी जाणून घेण्यात चाहत्यांना कायमच रस असतो. त्यात अनेकांना कलाकारांच्या लग्न आणि अफेअरविषयीही उत्सुकता लागून राहिलेली असते. आपले आवडते कलाकार लग्नबंधनात कधी अडकणार? याबद्दल चाहत्यांमध्ये कुतूहल असतं. अशीच लग्नाविषयीची उत्सुकता असलेला अभिनेता म्हणजे शिव ठाकरे.
मराठीसह हिंदी मनोरंजन विश्वात ‘आपला माणूस’ म्हणून शिवने आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. आपल्या मनमिळाऊ स्वभावामुळे शिवने अनेकांची मनं जिंकली आहेत. शिव सोशल मीडियावर कायमच सक्रीय असतो. सोशल मीडियावर तो त्याचे अनेक फोटो व व्हिडीओ शेअर करत असतो. सोशल मीडियावर त्याला अनेकदा लग्नाबद्दल चाहत्यांकडून विचारणा करण्यात येते.
अशातच शिवने त्याच्या लग्नाबद्दल खुलासा केला आहे. शिवने त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. शिव अनेकदा काही गरीब मुलांना मदत करत असतो. तसंच तो त्याच्या गाडीतून अनेकदा या लहान मुलांना सफर घडवून आणताना दिसतो. नुकतंच त्याला लहान मुलांनी लग्नाबद्दल विचारलं. ज्यावर शिवने उत्तर दिलं आहे.
शिवने त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर व्हिडीओ शेअर केला आहे, या व्हिडीओमध्ये शिव असं म्हणतो, “आता लग्न केल्यानंतर मुली सोडून जातात. म्हणून मला लग्न करण्याची भिती वाटत आहे.” यावर त्याच्या गाडीतील मुलगी त्याला “तुला कोण सोडून जाणार आहे? तू आणि तुझी पत्नी लग्नानंतर खूप छान एकत्र राहाल. लग्नानंतर मुलगी सोडून जात नाही” असं म्हणते.
यावर शिव पुन्हा त्या मुलीला असं म्हणतो, “आता जमाना बदलला आहे. आता मुली लग्नानंतर सोडून जातात आणि सामानही घेऊन जातात. तुम्ही तितकं सामान कमावलं असेल तर… म्हणून मला लग्नाची भिती वाटतेय. त्यामुळे मी संन्यास घेणार आहे. मी जंगलात जाऊन संन्यास घेणार.” यानंतर गाडीतील दोन्ही मुलं हसायला लागतात.
दरम्यान, शिवने आजवर अनेक रिअॅलिटी शोमध्ये भाग घेत या चंदेरी दुनियेत आपले एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. शिवने एमटीव्हीच्या ‘रोडीज’ या शोमध्ये सहभाग घेतला होता. त्यानंतर तो ‘मराठी बिग बॉस’च्या दुसऱ्या पर्वातही झळकला होता. या पर्वाचा तो विजेता ठरला होता. त्यानंतर त्याने हिंदी ‘बिग बॉस’मध्येही सहभाग घेतला होता. हिंदी ‘बिग बॉस’च्या १६ व्या पर्वाचे उपविजेतेपद त्याने पटकावले होते.