अतिशय वादग्रस्त पण तितकाच लोकप्रिय असलेला रिएलिटी शो म्हणजे ‘बिग बॉस’. यंदाचं ‘बिग बॉस मराठी’चं चौथं पर्व अनेक कारणांमुळे चर्चेत राहिलं. ‘देवमाणूस’ मालिकेतून प्रसिद्धी मिळवलेली अभिनेत्री तेजस्विनी लोणारीही यंदाच्या पर्वात सहभागी झाली होती. तल्लख बुद्धी व उत्तम खेळाच्या जोरावर तेजस्विनीने घरातील इतर स्पर्धकांसह प्रेक्षकांनाही तिची दखल घेण्यासाठी भाग पाडले. परंतु, टास्कदरम्यान हाताला दुखापत झाल्याने तेजस्विनीला ‘बिग बॉस’चा खेळ अर्ध्यातच सोडावा लागला होता.
‘बिग बॉस मराठी’नंतर तेजस्विनी आता चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. तेजस्विनीने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत ही माहिती दिली आहे. तिच्या नव्या चित्रपटाचं नाव अद्याप गुलदस्त्यात आहे. या चित्रपटात तेजस्विनी प्रसिद्ध अभिनेते मकरंद अनासपुरे यांच्याबरोबर स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. तेजस्विनीने मकरंद अनासपुरे यांच्याबरोबरचा फोटो तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर केला आहे.
हेही वाचा>> अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा २’ची बॉलिवूड अभिनेत्याने उडवली खिल्ली, म्हणाला “हे पोस्टर पाहून…”
“वयाच्या सोळाव्या वर्षांपासून मला जे गुरु आणि सहकलाकार म्हणून लाभलेले मकरंद अनासपुरे सर, ज्यांच्याबरोबर पाच चित्रपट करण्याचा योग आला आणि त्या चित्रपटांमुळे जी प्रसिद्धी मिळाली आता हीच जोडी तुमच्यासाठी घेऊन येत आहे…धमाकेदार चित्रपट…” असं कॅप्शन तेजस्विनीने फोटोला दिलं आहे.
तेजस्विनीच्या या पोस्टवर कमेंट करत चाहत्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. तेजस्विनीने ‘दोघात तिसरा आता सगळा विसरा’, ‘नो प्रॉब्लेम’, ‘बाप रे बाप डोक्याला ताप’, ‘गुलदस्ता’ आणि ‘बायको नंबर १’ या चित्रपटात मकरंद अनासपुरे यांच्याबरोबर स्क्रीन शेअर केली होती.