गेल्या काही दिवसांपासून विमानांसंबंधित अनेक घटना समोर येत आहे. अहमदाबाद येथे १२ जून रोजी एअर इंडियाचे विमान कोसळले, ज्यात अनेकांना आपले प्राणही गमवावे लागले. या घटनेमुळे विमान सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. अशातच जोधपुरहून मुंबईला येणाऱ्या इंडिगो विमानात तांत्रिक बिघाड झाला. यामुळे अहमदाबादमध्ये विमानाचं इमरजन्सी लॅंडींग करावं लागलं.
जोधपुरहून मुंबईला येणाऱ्या या विमानात ‘बिग बॉस ओटीटी ३’ फेम अभिनेत्रीसुद्धा होती आणि या घटनेबद्दल तिने स्वत: माहिती दिली आहे. सना एका छोट्या कामासाठी जोधपूरला गेली होती आणि मुंबईला परतत असताना ही घटना घडली. याबद्दल तिनं तिच्या इन्स्टाग्राम व्हिडीओ शेअर करत माहिती दिली आहे.
सनाने इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये असं म्हटलंय, “मी जोधपुरहून मुंबईला येत होते. आम्ही तिथून निघालो आणि मग एक तासांनी काही तांत्रिक कारणांमुळे आम्हाला अहमदाबाद इथे इमरजन्सी लॅंडींग करावं लागलं. वैमानिकांनी हा योग्य निर्णय घेतला. त्यानंतर विमान तपासले गेले आणि त्यांनी सांगितलं की प्रवाशांसाठी दुसऱ्या विमानाची गरज आहे.”

यानंतर ती म्हणते, “नशिबाने अहमदाबादवरुन मुंबईसाठी विमान होते. त्यात माझ्याकडे फार काही सामानही नव्हतं. त्यामुळे मी मुंबईच्या दिशेने येणाऱ्या मुंबईत आले. यानिमित्ताने मला इंडिगो विमान कंपनीला धन्यवाद म्हणायचे आहेत. त्यांच्यामुळे मी सुरक्षित मुंबईला आले आहे. बाकीचे जे लोक होते ते अजूनही विमानतळावरच आहेत. सुदैवाने मी सुरक्षित पोहोचले आहे. समजत नाहीय, या जगात काय चाललंय? कळत नाहीय सगळ्या विमानांबरोबर हे काय घडत आहे? पण यावर काही तरी उपाय शोधण्याची गरज आहे.”

दरम्यान, नुकत्याच घडलेल्या अहमदाबादमधील एका भयानक एअर इंडिया अपघातामुळे सर्वत्र चिंता वाढली आहे. त्या अपघातात २४१ प्रवाशांचा मृत्यू झाला आणि केवळ एकाच प्रवाशाचा जीव वाचला. त्यानंतर अशा आपत्कालीन लँडिंग आणि फ्लाइट वळवण्याच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे

सनाबद्दल सांगायचं झालं तर, तिने छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिकांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. ‘कितनी मोहब्बत है २’, ‘इस प्यार को क्या नाम दूं’, ‘आदत से मजबूर’ या मालिकांमधून ती प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. २०२१ मध्ये ती ‘खतरों के खिलाडी ११’मध्ये स्पर्धक म्हणून सहभागी झाली होती. यानंतर तिने ‘बिग बॉस ओटीटी ३’मध्ये सहभागी झाली होती.