chala hava yeu dya season 2 title song: ‘चला हवा येऊ द्या’च्या सीझन २ ची काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात चर्चा होत आहे. या कार्यक्रमाचा मोठा चाहतावर्ग आहे. जवळजवळ १० वर्षे ‘चला हवा येऊ द्या’ने प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन केले. त्यांना खळखळून हसण्यास भाग पाडले. त्यामुळे हा कार्यक्रम जेव्हा संपला त्यावेळी अनेकांनी निराशा व्यक्त केली होती.

आता ‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमाचा दुसरा सीझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार असल्याची घोषणा ‘झी मराठी’ने काही दिवसांपूर्वी केली होती. त्यानंतर टीझरमधून कार्यक्रमाची झलक पाहायला मिळाली होती. चाहते या कार्यक्रमाची आतुरतेने वाट पाहत असल्याचे दिसत आहे. अशातच ‘चला हवा येऊ द्या’चे शीर्षकगीत समोर आले आहे.

‘चला हवा येऊ द्या’चं टायटल साँग प्रदर्शित

झी मराठी वाहिनीने सोशल मीडियावर नुकताच एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यामध्ये श्रेया बुगडे, कुशल बद्रिके, भरत गणेशपुरे, गौरव मोरे, प्रियदर्शन जाधव, तसेच अभिजीत खांडकेकर दिसत आहेत. हे ‘चला हवा येऊ द्या’चे शीर्षकगीत आहे. हा व्हिडीओ शेअर करताना ‘चला हवा येऊ द्या – कॉमेडीचं गँगवॉर’ २६ जुलैपासून सुरू होणार आहे, असे म्हटले आहे. तसेच शनिवारी व रविवारी रात्री ९ वाजता हा कार्यक्रम प्रदर्शित होणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे.

या शीर्षकगीताला ए. व्ही. प्रफुल्लचंद्र यांनी गीतलेखन व संगीत या बाजू सांभाळल्या आहेत; तर ए. व्ही. प्रफुल्लचंद्र व पवनी वासा यांनी हे गीत गायले आहे.

हा व्हिडीओ पाहिल्यानंतर गौरव मोरेने राडा, अशी कमेंट केली आहे; तर कुशल बद्रिकेनेदेखील इमोजी शेअर करीत आनंद व्यक्त केला आहे. अनेकांनी कमेंट्स करत या कार्यक्रमाची वाट पाहत असल्याचे म्हटले आहे. तर अनेकांनी भाऊ कदम, सागर कांरडे हे कार्यक्रमात असायला पाहिजेत, अशा कमेंट्स केल्या आहेत. त्याबरोबरच नीलेश साबळेऐवजी या सीझनमध्ये अभिनेता अभिजीत खांडकेकर सूत्रसंचालन करणार आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आता ‘चला हवा येऊ द्या’च्या या दुसऱ्या सीझनला प्रेक्षकांचा कसा प्रतिसाद मिळणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.