Kushal Badrike Poem For Wife : ‘चला हवा येऊ द्या’ फेम कुशल बद्रिकेने सगळ्यांना खळखळवून हसवत, सर्वांचं मनोरंजन करत आपल्या अभिनय कौशल्याने प्रत्येकाच्या मनावर राज्य केलं आहे. कुशल हा उत्तम अभिनेता तर आहेच. शिवाय तो उत्तम लेखक आणि कवीही आहे; असं म्हटलं तर वावगं होणार नाही. कुशल सोशल मीडियावर कायमच सक्रीय असतो.

कुशल सोशल मीडियावर स्वतःचे फोटो-व्हिडीओ शेअर करण्याबरोबरच अनेकदा त्याच्या पत्नीसाठीही काही पोस्ट शेअर करताना दिसतो. कुशल आणि त्याची पत्नी सुनयनाचा प्रेमविवाह झाला असून त्यांच्यातील खास बॉण्ड सोशल मीडियाद्वारे चाहत्यांना पाहायला मिळाला आहे. कुशलने अनेकदा सोशल मीडियावरील पोस्टमधून बायकोवर असलेलं प्रेम व्यक्त केलं आहे.

अशातच आता कुशलने पत्नीसाठी एक खास कविता सादर केली आहे. झी मराठीवरील ‘आम्ही सारे खवय्ये’च्या दुसऱ्या सीझनमध्ये त्याने बायकोसाठी खास कविता सादर केली आहे. कुशलने पत्नीसाठी सादर केलेली ही कविता अशी आहे की,

तुझ्या पदरा बांधली माझ्या शेल्याची गं गाठ
तुझ्या पैंजण पाऊला माझी गरिबीची वाट
कुंकू हळदीने सये तुझं डोरलं भरलं
माझं आयुक्ष बांधलं त्यात उरलं सुरलं
घास वावाळूनी टाक माझे एक एक सगे
हात जीव घेऊन मी तुला ववाळाय बघे
माप ओलांडूनी आली आत जोडवी घरात
नाव घेताना कळलं नाव गोविलं नावात
उमटलं माझ्या दारी तुझं एकेक पाऊल
झाली घराची पंढरी, ही माझ्या रखुमाईची चाहुल

ही कविता स्वतः कुशलने पत्नीसाठी लिहीली असून या व्हिडीओखाली त्याने याबद्दल त्याच्या भावनाही व्यक्त केल्या आहेत. “बायकोसाठी लिहिलेली ही माझी सगळ्यात आवडती कविता आहे” असं म्हणत ही कविता सादर करायला दिल्यानिमित्त त्याने झी मराठी वाहिनीचे आभार मानले आहेत.

कुशलची ही कविता अनेकांच्या पसंतीस पडली आहे. केवळ चाहतेच नव्हे तर अनेक कलाकारांनीसुद्धा या व्हिडीओखाली तशा प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. ‘खूप छान’, ‘खूप सुंदर’, ‘नांदा सौख्य भरे’, ‘दोघांना खूप खूप प्रेम’, ‘सदैव सुखी राहा’ या आणि अशा अनेक कमेंट्स मधून चाहत्यांनी त्यांचं प्रेम व्यक्त केलं आहे.

दरम्यान, कुशलच्या कामाबद्दल बोलायचं झालं, तर तो सध्या झी मराठीवरीलच ‘चला हवा येऊ द्या’ या लोकप्रिय शोच्या दुसऱ्या सीझनमधून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या शोमध्ये तो एका टीमचा लीडर आहे, तसंच तो विनोदी प्रहसनंदेखील सादर करताना दिसतो.