Kushal Badrike Shares Video With Wife Sunayana : ‘चला हवा येऊ द्या’ फेम मराठी अभिनेता कुशल बद्रिके हा पडद्यावर जितका विनोदी आहे, तितकाच तो त्याच्या खऱ्या आयुष्यातदेखील गंमतीशीर आहे. त्याच्या या विनोदी स्वभावाचा प्रत्यय वेळोवेळी आलाच आहे. ‘चला हवा येऊ द्या’ या लोकप्रिय कार्यक्रमाच्या माध्यमातून कुशल अवघ्या महाराष्ट्रात लोकप्रिय झाला. या शोमधून विनोदी स्किट्स करत त्याने चाहत्यांचे चांगलेच मनोरंजन केले आहे.
मनोरंजन विश्वात सक्रीय असणारा कुशल हा सोशल मीडियावरही तितकाच सक्रिय असतो. सोशल मीडियावर तो त्याचे अनेक फोटो-व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहत असतो. त्याच्या या फोटो किंवा व्हिडीओखालील कॅप्शन्सही प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतात. अशातच त्याने पत्नीसाठी एक खास पोस्ट शेअर केली आहे.
कुशलचा सुनयनाबरोबर प्रेमविवाह झाला असून त्यांच्यात नवरा-बायकोपेक्षा अधिक मित्र-मैत्रिणीचं नातं असल्याचं कायमचं पाहायला मिळाले आहे. हे खास नातं त्यांच्या अनेक फोटो किंवा व्हिडीओमधून पाहायला मिळतं. कुशल आपल्या पत्नीबरोबरचे अनेक फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असतो. अशातच त्याने नुकताच एक खास व्हिडीओ शेअर केला आहे.
‘चला हवा येऊ द्या’च्या मंचावर नुकतीच कलाकारांच्या घरच्यांनी हजेरी लावली होती. यावेळी कुशलची पत्नी सुनयनाही हीदेखील या खास भागात सहभागी झाली होती. याच मंचावरील व्हिडीओ कुशलने शेअर केला आहे आणि या व्हिडीओसह तो असं म्हणतो, “एकदा मी बायकोला विचारलं की तुला, ‘माझ्यातली’ नेमकी कुठली गोष्ट आवडली? म्हणजे माझ्यात ना रंग, ना रूप, ना पैसा, ना नोकरी… मग तू का म्हणून मला पसंत केलं असशील?”
यापुढे कुशलने सुनयनाने त्याला दिलेल्या उत्तराचा उल्लेख करत म्हटलं, “माझ्या प्रश्नावर सुनयना म्हणाली, “मला ना तुझे डोळे फार आवडतात, मनातलं काही लपवता येत नाही त्यांना”. आता ते खरं का खोटं माहीत नाही… पण एखाद्या दगडातसुद्धा देव शोधणारी माणसं जगात असतात. हे मात्र खरं.”
कुशल बद्रिके इन्स्टाग्राम व्हिडीओ
कुशलने शेअर केलेल्या या व्हिडीओचं आणि कॅप्शनचं अनेकांनी कौतुक केलं आहे. श्रेया बुगडे, अभिजीत खांडकेकर, मेघना एरंडे, हेमांगी कवी यांसह अमेकांनी या व्हिडीओचं कौतुक केलं आहे. तसंच चाहते मंडळींनीसुद्धा या व्हिडीओ आणि व्हिडीओखालील कॅप्शनचं कौतुक केलं आहे.
दरम्यान, ‘चला हवा येऊ द्या’ शो चा नवा सीझन प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या शोच्या नुकत्याच एका भागात गौरव मोरे आणि श्रेया बुगडे यांची आई, तसंच भारत गणेशपुरे, प्रियदर्शन जाधव आणि कुशलची पत्नी यांनीही सहभाग घेतला होता. त्याचबरोबर शोचा होस्ट अभिजीत खांडकेकरची पत्नी सुखदा हीसुद्धा सहभागी झाली होती.