Chala Hawa Yeu Dya Fame Shreya Bugde : अभिनेत्री श्रेया बुगडे सध्या ‘चला हवा येऊ द्या’च्या नवीन पर्वामुळे चर्चेत आहे. लवकरच हा कार्यक्रम सुरू होणार असून, अभिनेत्री पुन्हा एकदा तिच्या विनोदी शैलीने प्रेक्षकांना हसवण्यासाठी सज्ज आहे. या कार्यक्रमानिमित्त नुकताच अभिनेता कुशल बद्रिके व श्रेया बुगडे यांनी एक व्हिडीओ इन्स्टाग्रामवर पोस्ट केला होता. त्यामध्ये ‘चला हवा येऊ द्या’च्या सेटवर हे कलाकार चित्रीकरणासाठी तयारी करताना दिसले.
श्रेयाने आता अजून एक खास पोस्ट शेअर केली आहे. ही पोस्ट तिने तिचा मित्र व अभिनेता अभिजीत खांडकेकरसाठी केली आहे. याचं निमित्त म्हणजे आज त्याचा वाढदिवस आहे. अभिजीत खांडकेकर ‘चला हवा येऊ द्या’च्या नवीन पर्वाचं सूत्रसंचालन करणार आहे. त्यामुळे हे दोघे आता एकाच कार्यक्रमासाठी काम करणार असल्यानं श्रेया उत्सुक असल्याचं तिच्या पोस्टमधील कॅप्शनमधून दिसत आहे.
श्रेया बुगडेनं अभिजीतच्या वाढदिवसानिमित्त पोस्ट शेअर करीत त्याला खास कॅप्शनही दिली आहे. त्यामधून तिनं लिहिलं आहे, “वाढदिवसाच्या शुभेच्छा अभी. मी खूप क्वचितच व्यक्त होत असते. आता मी हे लिहीत आहे. कारण- मी खूप आनंदी आहे. मला फक्त तुला एवढंच सांगायचं आहे की, तू माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहेस. गेलं वर्ष माझ्यासाठी खूप कठीण होतं. माझी प्रकृती ठीक नव्हती, पण तू त्यावेळी मला खंबीरपणे साथ दिलीस”.
श्रेया पुढे म्हणाली, “तू खूप चांगला माणूस आहेस. कायम मदतीसाठी तत्पर असतोस. मी खूप नशीबवान आहे की, माझ्याकडे तुझ्यासारखा मित्र आहे. प्रत्येकाला तुझ्यासारखा मित्र मिळावा. यापुढेसुद्धा तुला असंच कायम इतरांना त्यांच्या कठीण काळात मदत करता यावी ही इच्छा. तुला चांगली कामं मिळत राहोत, तुझं आरोग्य उत्तम राहावं यासाठी शुभेच्छा. तुझ्यासह नवीन प्रोजेक्टमधून कामं करण्यासाठी आणि भन्नाट आठवणी तयार करण्यासाठी मी उत्सुक आहे”.
श्रेया अभिजीतबद्दल पुढे म्हणाली, “गेली अनेक वर्षे मी तुला ओळखत आहे. या वर्षांमध्ये तू कायम माझी साथ दिली आहेस. असाच पुढे जात राहा. खूप खूप प्रेम”. यावेळी श्रेयाने अभिजीतबरोबरचे काही खास फोटोसुद्धा शेअर केले आहेत. त्यातील एक फोटो हा त्यांच्या आगामी कार्यक्रमाच्या चित्रीकरणादरम्यानचा आहे. त्यामध्ये दोघेही एका वेगळ्या लूकमध्ये पाहायला मिळत आहेत.
दरम्यान, ‘चला हवा येऊ द्या’चं नवीन पर्व लवकरच सुरू होणार आहे. या नवीन पर्वाचं ‘चला हवा येऊ द्या – कॉमेडीचं गँगवॉर’ असं नाव आहे. ‘झी मराठी’ वाहिनीने या कार्यक्रमाचा व्हिडीओ त्यांच्या सोशल मीडिया पेजवरून शेअर केला असून, त्यामध्ये या कार्यक्रमात सहभागी झालेले कलाकार पाहायला मिळत आहेत. या नवीन पर्वात कुशल बद्रिके, श्रेया बुगडे, भरत गणेशपुरे यांच्यासह अभिजीत खांडकेकर, गौरव मोरे, प्रियदर्शन जाधव हे कलाकारसुद्धा झळकणार आहेत. २६ जुलैपासून शनिवार- रविवारी रात्री ९ वाजता हा कार्यक्रम प्रसारित होणार आहे.