Chala Hawa Yeu Dya New Season : ‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमाचं नवीन पर्व आजपासून ( २६ जुलै ) प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या नव्या पर्वाचं स्वरुप काहीसं बदलण्यात आलं आहे. यंदाच्या पर्वात महाराष्ट्रातील विविध भागांतून निवड करण्यात आलेले विनोदवीर सहभागी झाले आहेत. हे विनोदवीर पाच गँगलीडर्सच्या टीममध्ये विभागण्यात आले आहेत.
गौरव मोरे, प्रियदर्शन जाधव, श्रेया बुगडे, भारत गणेशपुरे आणि कुशल बद्रिके यंदाच्या पर्वातील गँगलीडर्स असतील. तर, लोकप्रिय अभिनेता अभिजीत खांडकेकर या पर्वाचं सूत्रसंचालन करणार आहे. २०२४ मध्ये ‘चला हवा येऊ द्या’ या शोने तब्बल १० वर्षांनी ब्रेक घेतला होता. यावेळी सगळेजण भावुक झाले होते.
आता हा शो नव्याने सुरू होणार असल्याने पुन्हा एकदा त्याच भावना कुशल बद्रिकेच्या मनात दाटून आल्या आहेत. अभिनेत्याने ‘चला हवा येऊ द्या’ कार्यक्रमाच्या नव्या सीझनच्या पहिल्या दिवशी खास पोस्ट शेअर करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
कुशल बद्रिके लिहितो, “नव्याच्या उंबरठ्यावर जुनी काही पानं चाळली गेली, आणि मन भरून आलं…पण माझे बाबा कायम म्हणायचे, माणसाला सोडून देता आलं पाहिजे, धरून ठेवायला आपण काय पिंपळावरचं भूत आहोत! माणसाने “जुन्याची कास सोडायची आणि नव्याची आस धरायची”! आज ती वेळ येऊन ठेपलीये. ‘चला हवा येऊ द्या’ नव्याने सुरु होतंय, आता नवीन भिडू नवीन राज्य, नव्याने चुकायचं, नव्याने शिकायचं. तुमच्या सगळ्यांच्या शुभेच्छा आणि शुभाशीर्वाद आमच्या सोबत असूद्या प्लीज. या प्रवासात त्यांची गरज आहे.”
कुशलने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये तो रंगमंच व रसिक प्रेक्षकांचा आशीर्वाद घेऊन या नव्या पर्वाची सुरुवात करणार असल्याचं पाहायला मिळत आहे.
दरम्यान, कुशल बद्रिकेने शेअर केलेल्या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी “भावा तू जबरदस्त आहेस आणि कायम राहणार”, “अभिनंदन कुशल रॉक द स्टेज”, “संपूर्ण हवा येऊ द्या कार्यक्रमाच्या टिमला मनापासून शुभेच्छा” अशा कमेंट्स करत शुभेच्छा दिल्या आहेत.