झी मराठीवर ‘चला हवा येऊ द्या’ या शोला खूपच मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला होता. गेली १० वर्षं या शोनं प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. डॉ. नीलेश साबळे, भाऊ कदम, कुशल बद्रिके, भरत गणेशपुरे, सागर कारंडे व श्रेया बुगडे यांच्यासह अनेक विनोदी कलाकारांनी या शोमधून प्रेक्षकांना हसवण्याचं काम केलं. मात्र, १० वर्षं मनोरंजन केल्यानंतर या शोनं प्रेक्षकांचा निरोप घेतला. त्यानंतर छोट्याशा ब्रेकनंतर आता ‘चला हवा येऊ द्या’चं नवं पर्व प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे.
२६ जुलै रोजी ‘चला हवा येऊ द्या’च्या नव्या पर्वाचा पहिला भाग प्रसारित झाला. प्रेक्षकांचा हा लाडका कार्यक्रम पुन्हा त्यांच्या भेटीला आल्याने तेही या पर्वासाठी उत्सुक होते. पण, या नवीन पर्वात ‘चला हवा येऊ द्या’मधले काही जुने चेहरे नाहीत. या चेहऱ्यांना प्रेक्षक ‘मिस’ करत आहेत. ‘चला हवा येऊ द्या’च्या पहिल्या भागानंतर चाहत्यांनी तशा प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेकांनी भाऊ कदम आणि नीलेश साबळे यांना ‘मिस’ करत असल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.
अशातच शोमधील श्रेया बुगडेनेही भाऊ कदम आणि नीलेश साबळे यांच्या शोमधील अनुपस्थितीबद्दल प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. Hunch Media या यूट्यूब वाहिनीशी साधलेल्या संवादात श्रेयाला भाऊ कदम आणि नीलेश साबळेबद्दल प्रश्न विचारण्यात आला. ‘चला हवा येऊ द्या’च्या नव्या पर्वात नीलेश साबळे आणि भाऊ कदम नसल्याने त्यांची आठवण येते का? असं तिला विचारण्यात आलं. त्यावर श्रेयानंही दोघांना ‘मिस’ करत असल्याचं म्हटलं.
त्याबद्दल श्रेया म्हणाली, “डॉ. नीलेश साबळे आणि भाऊ कदम या पर्वात नाहीत. त्यांची काही वैयक्तिक कारणं आहेत. त्यांचं एकत्र शूटिंगही सुरू आहे. आम्हाला त्यांची आठवण येत आहेच. नक्कीच… मला वाटतं प्रेक्षकसुद्धा त्यांना ‘मिस’ करत आहेत.”
त्यानंतर श्रेयानं ‘चला हवा येऊ द्या’च्या नव्या पर्वाबद्दल असं म्हटलं, “मला वाटतं की, ‘चला हवा येऊ द्या’चा हा नवा सीझन आहे. त्यामुळे त्यात अनेक गोष्टी नवीन आहेत, ज्या याआधी पाहिलेल्या नाहीत. म्हणून मला वाटतं प्रेक्षकांनासुद्धा थेट तुलना करण्यासारखं काही नाही. कारण- या नव्या पर्वाचा फॉरमॅटच पूर्णपणे वेगळा आहे. आता महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातलं नवीन टॅलेंट या पर्वात पाहायला मिळणार आहे.”
श्रेया बुगडे इन्स्टाग्राम पोस्ट
पुढे श्रेया असं म्हणते, “‘चला हवा येऊ द्या’ हा शो अनेक कारणांनी मैलाचा दगड ठरला. त्याचं लिखाण असो, त्याचं दिग्दर्शन असो… आणि नक्कीच पूर्ण टीममुळे त्याला यश मिळालं होतं. पण असा शो जेव्हा थांबतो आणि तो विश्रांतीनंतर पुन्हा सुरू होतो. तेव्हा लोक त्या शोमधून काहीतरी नवीन अपेक्षा करीत असतात. त्यामुळे चॅनेल आणि बाकीच्या टीमचं म्हणणं होतं की, आता नवीन पर्व येत आहे, तर त्यात काहीतरी नावीन्य असलं पाहिजे. आपण एकेक टप्पा पुढे जात, लोकांना काहीतरी नवीन देण्याचा प्रयत्न करायला हवा.”