Chala Hawa Yeu Dya New Season Host By Abhijeet Khandkekar : ‘चला हवा येऊ द्या’ कार्यक्रमाचा नवीन सीझन येत्या २६ जुलैपासून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. गेली १० वर्षे या कार्यक्रमाची संपूर्ण धुरा डॉ. निलेश साबळेने सांभाळली होती. मात्र, निलेश सध्या सिनेमाच्या शूटिंगमध्ये व्यग्र असल्याने यंदाच्या पर्वात त्याच्याऐवजी लोकप्रिय अभिनेता अभिजीत खांडकेकर सूत्रसंचालन करणार आहे.

या नवीन प्रवासाबद्दल अभिजीत पहिल्यांदाच व्यक्त झाला आहे. तो म्हणाला, “झी मराठीबरोबरचं माझं नातं अगदी माझ्या करिअरच्या सुरुवातीपासून आहे. ‘महाराष्ट्राचा सुपरस्टार’ या कार्यक्रमातून मी आणि माझ्यासारखे अनेक कलाकार या क्षेत्रात आले आणि आजपर्यंत आम्ही सगळे काम करत आहोत. त्यामुळे ‘झी’ आणि माझं नातं फारच खास आहे. त्यात ‘चला हवा येऊ द्या’सारख्या अत्यंत लोकप्रिय कार्यक्रमासाठी जेव्हा मला विचारलं गेलं तेव्हा तो माझ्यासाठी खूपच आनंदाचा क्षण होता. मुळात मला निवेदनाची प्रचंड आवड आहे आणि मी ही संधी चॅलेंज म्हणून स्वीकारली आहे.”

अभिजीत पुढे म्हणाला, “गेली १० वर्षे ज्या पातळीवर हा कार्यक्रम नेऊन ठेवला आहे, त्या टप्प्यावरून तो अजून पुढे नेणं हे खरंच चॅलेंजिंग आहे. प्रेक्षकांना आधीच्या पर्वाप्रमाणेच हे पर्व पाहतानाही खूप मजा येईल. मला याचं दडपण वगैरे नाहीये. कारण, मी माझ्या पद्धतीने एक नवीन सुरुवात करणार आहे. या सीझनसाठी सगळेच खूप उत्साही आहेत. ‘चला हवा येऊ द्या’ हा शो महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पाहिला जातो आणि यंदा शोमध्ये अनेक स्पर्धक सहभागी होणार आहेत. ही संधी प्रत्येकाला मिळतेय… याचा मला विशेष आनंद आहे. ज्या भागांमध्ये ऑडिशन झाल्या तिथून उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. या निमित्ताने काही नवीन हास्य कलाकार महाराष्ट्राला मिळणार आहेत आणि त्या कलाकारांच्या करिअरला एक नवी दिशा मिळणार आहे.”

सहकलाकारांबद्दल सांगताना अभिजीत म्हणाला, “आमच्या टीमबद्दल सांगायचं झालं तर, सगळ्यांबरोबर माझं फारच छान बॉण्डिंग झालं आहे. कारण, मी त्यांना आधीपासून ओळखतो. श्रेया, कुशल, गौरव, प्रियदर्शन आणि भरत दादा या सर्वांबरोबर खूप छान काम सुरू आहे आणि आतापर्यंत मी एक प्रेक्षक म्हणून हे सगळं अनुभवत होतो पण, एक निवेदक म्हणून या टीमचा भाग झाल्यावर खूपच मजा येईल.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

प्रेक्षक हे आमचे मायबाप

“मला हेच म्हणायचं आहे की, प्रेक्षक हे आमचे मायबाप आहेत, त्यांच्याकडून इतकीच अपेक्षा आहे की जितकं प्रेम त्यांनी याआधीच्या पर्वांना दिलं, तितकंच भरभरून प्रेम या पर्वाला सुद्धा द्यावं. यंदा या पर्वातून महाराष्ट्राला अनेक नवीन हास्यकलाकार मिळणार आहेत. यंदाचं ‘चला हवा येऊ द्या’ नेहमीपेक्षा वेगळ्या प्रकारे सादर होणार आहे आणि हे नवीन बदल प्रेक्षकांना नक्की आवडतील याचीही काळजी घेतली आहे. प्रेक्षकांनी गेली १० वर्षे प्रेम देऊन या कार्यक्रमाला इतक्या मोठ्या शिखरावर नेऊन ठेवलं, तेच प्रेम आणि आशीर्वाद प्रेक्षकांकडून या पर्वासाठीही अपेक्षित आहेत.” अशा भावना अभिजीत खांडकेकरने व्यक्त केल्या आहेत.