शिक्षणाच्या अभावामुळे किंवा शिक्षणच न घेतल्यामुळे अनेकदा काही लोकांकडून गैरफायदा घेतला जातो. शिक्षण नसल्याने व्यवहारज्ञान नसतं आणि यामुळे अनेक आर्थिक आणि सामाजिक संधी गमावल्या जातात. असाच काहीसा अनुभव एका विनोदी अभिनेत्याला आला होता. अशिक्षितपणामुळे अभिनेत्याला पैशांमधील फरकही कळत नव्हता.
विनोदी अभिनेता सुदेश लहरीने त्याच्या अशिक्षितपणाबद्दल नुकत्याच एका मुलाखतीत प्रतिक्रिया दिली. याबद्दल त्याने सांगितलं की, “आईवडिलांकडे शाळेची फी भरण्यासाठी पैसे नव्हते, त्यामुळे माझं कधीच शाळेत जाणं झालं नाही. यामुळे मी स्वतःला अशिक्षित म्हणवतो.” यानंतर अभिनेत्याने कमी शिक्षणामुळे कार्यक्रमात फसवणूक झाल्याचंही सांगितलं.
याबद्दल सुदेश असं म्हणाला, “‘द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज’च्या पहिल्या सीझनमध्ये माझ्याबरोबर फसवणूक झाली होती. त्यावेळी ‘फिफ्टी’ आणि ‘फिफ्टीन’ यातला फरकही मला माहीत नव्हता. जेव्हा मला विचारलं गेलं की, तुला किती पैसे हवेत, तेव्हा मी ५० हजार हवे आहेत असं मनात असूनही १५ हजार रुपये सांगितले. यामुळे नुकसान झाल्याचं वाटलं. मग मी एक मॅनेजर ठेवला आहे, जो आता माझे सगळे आर्थिक व्यवहार पाहत आहे.”
अमन औजला यांच्या पॉडकास्टमध्ये सुदेशने त्याच्या बालपणाबद्दलचे काही अनुभव सांगितले. याबद्दल तो म्हणाला, “मी फक्त १७ वर्षांचा असताना माझं लग्न झालं आणि माझी पत्नी फक्त १५ वर्षांची होती. तेव्हा आम्हाला काहीच कळत नव्हतं. नंतर जेव्हा मुलं झाली, तेव्हा काय करायचं हेही समजत नव्हतं. घरात पैसे नव्हते. आमच्याकडे रुग्णालयासाठीही पैसे नव्हते.”
यापुढे तो म्हणाला, “मी अशिक्षित आहे. मी कधीही शाळेत गेलो नाही – अगदी मी शाळा बघितलीसुद्धा नाही. कारण तेव्हा फी भरण्यासाठी सुद्धा पैसे नव्हते. मी पैशांसाठी दुकानांमध्ये काम केलं, मेकॅनिक म्हणूनही काम केलं. लिहिता-वाचता येत नसलं, तरी मी कलाकार बनायचं ठरवलं होतं. मला वाचता येत नव्हतं, पण मी संवाद पाठ करायचो.”
सुदेश लहरी इन्स्टाग्राम पोस्ट
लहानपणी अशिक्षित असलेला हा अभिनेता आता लोकप्रिय विनोदी कलाकार आहे. तसंच तो सध्या ऐशो-आरामाचं आयुष्य जगत आहे. याबद्दल तो म्हणाला, “मी लहानपणी मोठमोठ्या हॉटेलमध्ये जायची अनेक स्वप्ने पाहिली होती. एक काळ होता; जेव्हा मुंबईत माझ्याकडे पाच घरे होती. मला वाटतं की, आपण पैसा खर्च करायला हवा. पैसा फक्त बँक खात्यात ठेवून काही उपयोग नाही.”