टीव्हीवरील सर्वात लोकप्रिय आणि आवडता शो ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ नेहमीच चर्चेत असतो. त्यातील सर्व पात्रं खूपच उत्तम आहेत. प्रत्येकाची स्वतःची एक कथा असते. एक ओळख आहे. त्यात मुख्यत: जेठालाला आणि दयाबेन या प्रमुख व्यक्तिरेखा खूपच लोकप्रिय आहेत. पण त्यापैकी दयाबेनची ही व्यक्तिरेखा बऱ्याच काळापासून शोमध्ये दिसलेली नाही. ही व्यक्तीरेखा साकरणारी अभिनेत्री दिशा वकानीही बऱ्याच काळापासून अभिनय क्षेत्रापासून दूर आहे. पण सध्या तिचा एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये ती एका मुलाला आपल्या मांडीवर घेऊन रडताना दिसत आहे. यासोबतच मागच्या बाजूला एक फोटो आहे, ज्याला हार घालण्यात आहे. हा व्हिडीओ पाहून दिशाला नेमकं झालंय तरी काय असाच प्रश्न अनेकांना पडलेला दिसत आहे.
दिशा वाकानी प्रेक्षकांमध्ये खूप लोकप्रिय आहे. ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’मध्ये तिच्या पुन्हा परतण्याची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. ती लवकरच शोमध्ये परतणार असल्याच्या अनेक वेळा चर्चा झाल्या होत्या पण नंतर त्या केवळ अफवा असल्याचं समोर आलं. दरम्यानच्या काळात असित मोदी यांनी दयाबेनलाही आणणार असल्याचे सांगितले, पण अद्याप ती शोमध्ये दिसलेली नाही. चाहते अजूनही दिशा शोमध्ये परत येण्याची वाट पाहत आहेत. याच दरम्यान, तिचा रडणारा व्हिडिओ समोर आला आहे. यामध्ये ती मुलाला हातात घेऊन रडत आहे. आणि तिच्या पतीच्या निधनाबद्दल बोलताना दिसत आहे. त्यामुळे सगळ्यांच्या चेहऱ्यावर हसू आणणाऱ्या दयाबेनचं काय झालंय? हे जाणून घेण्याची सर्वांनाच उत्सुकता आहे.
व्हिडीओमध्ये दिशा वाकानी म्हणतेय, “माझे पती सुशील त्रिवेदी रेल्वे हेड ऑफिसमध्ये होते. ट्रेनमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटात ते आम्हाला सोडून गेले. पण शासनाने मंजूर केलेली भरपाई अद्याप आम्हाला मिळालेली नाही. हा बॉम्बस्फोट सायंकाळी ५.४५ वाजता झाला आणि माझ्या पतीची ड्युटी ६ वाजेपर्यंत आहे, मग सरकारी कर्मचारी वेळेपूर्वी कसा निघून जाऊ शकतो, असं तेथल्या अधिकाऱ्यांनी सांगितलं. त्यांनी असं सांगून नुकसान भरपाई देण्यास नकार दिला. पीएफही मिळणार होता. तोही रोखून ठेवण्यात आला आहे. आता पतीच्या निधनानंतर मला रेल्वे क्वार्टर्सही सोडावं लागेल. मला एक मूल आहे, मी कुठे जाऊ? उत्पन्नही नाही आणि मदतही नाही. दोन वर्षांपासून सरकारी कार्यालयात फेऱ्या मारून काही फायदा झाला नाही.”
आणखी वाचा- Video: आर्यन खान ‘त्या’ सवयीमुळे होतोय ट्रोल, नेटकरी म्हणाले; “हा कधीच…”
दरम्यान दिशा वकानीचा व्हायरल झालेला हा व्हिडिओ आत्ताचा नसून २००८ मध्ये रिलीज झालेल्या ‘सी कंपनी’ या चित्रपटातील एक क्लिप आहे. ‘तारक मेहता’ फॅन क्लबने ही क्लिप त्याच्या इंस्टाग्रामवर शेअर केली आहे. दिशा वाकानीने यात छोटीशी भूमिका करून सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं. या चित्रपटात तुषार कपूरने पत्रकाराची भूमिका साकारली होती. आता चाहतेही या व्हिडिओवर प्रतिक्रिया देत आहेत आणि अभिनेत्रीच्या अभिनयाचे कौतुक करत आहेत. काहींनी तर आमच्या दया भाभीची कारकीर्द तुषार कपूरपेक्षा चांगली असल्याचेही लिहिलं आहे.