Devmanus Fame Ekta Dangar Shared A Video : ‘देवमाणूस – मधला अध्याय’ या मालिकेत अनेक कलाकार विविध भूमिका साकारताना दिसत आहेत. किरण गायकवाडची प्रमुख भूमिका असलेली ही मालिका सुरू झाल्यापासूनच चर्चेत आहे. या मालिकेत नुकताच एक महत्त्वपूर्ण भाग पाहायला मिळाला.

‘देवमाणूस’ मालिकेत गंगा या पात्राचा प्रवास संपला असून, गोपाळनं तिचा खून केल्याचं पाहायला मिळालं. या मालिकेत अभिनेत्री एकता डांगरने हे पात्र साकारलं. अशातच अभिनेत्रीनं मालिकेसाठी शेवटचा सीन शूट करीत असतानाचा पडद्यामागचा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. एकतानं शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये मालिकेत गोपाळ गंगाला मारतो या सीनचं चित्रीकरण सुरू असल्याचं पाहायला मिळतं. यावेळी हा सीन शूट करताना एकताला दडपण आल्याचं तिनं यामधून सांगितलं आहे.

एकता डांगरने सांगितला ‘देवमाणूस’ मालिकेत शेवटचा सीन शूट करतानाचा अनुभव

व्हिडीओला दिलेल्या कॅप्शनमधून एकतानं सांगितलं, “मालिकेतील पहिला सीनही फार रंजक होता गंगाची गंगा घाटावर बुलेटवरून एन्ट्री झालेली आणि आता शेवटचा सीनही रंजक आहे. गंगाचा हा प्रवास खूप कमाल होता.” या व्हिडीओमधून एकतानं सीन शूट करतानाचा तिचा अनुभव सांगितला आहे. ती म्हणाली, “खूप भीती वाटतेय मला. माझ्यावरून ट्रॅक्टर जाणार आहे. पोटात गोळा आला आहे. आम्ही पूर्ण काळजी घेऊनच शूट करणार आहोत.”

व्हिडीओत पुढे तिला शेवटचा सीन शूट करताना दिग्दर्शक व मालिकेतील टीममधील इतर मंडळी मदत करीत असल्याचं पाहायला मिळतं. मालिकेतील एकताचा हा शेवटचा सीन असून, ती आता या मालिकेचा निरोप घेणार आहे.

‘देवमाणूस’ मालिकेतील या भागामध्ये गंगा गोपाळवर राग व्यक्त करताना दिसली. गंगा व गोपाळमध्ये शेवटचा संवाद होत असताना, गंगा त्याला सांगते, “मी शेवटपर्यंत लढणार. गावातील सर्वांना तुझं सत्य सांगणार. देवमाणूस समजतात ना तुला; पण मी त्यांना सांगेन की, तू राक्षस आहेस. त्यावर गोपाळ गंगावर हसताना पाहायला मिळाला”. हा गोपाळ व गंगा यांच्यातील शेवटचा संवाद ठरला.

दरम्यान, २ जून २०२५ रोजी ‘देवमाणूस – मधला अध्याय’ ही मालिका सुरू झाली होती. मालिकेच्या सुरुवातीलाच एकताची म्हणजेच गंगा या पात्राची हटके अंदाजात एन्ट्री झाल्याचे पाहायला मिळाले होते. आता मालिका सुरू झाल्याच्या दोन-अडीच महिन्यांनंतर एकताचा या मालिकेतील प्रवास संपला आहे. त्यामुळे एकता डांगर आता कोणत्या नवीन भूमिकेतून भेटीला येणार याची प्रेक्षकांमध्ये उत्सुकता आहे.