Devmanus Fame Ekta Dangar Shared A Video : ‘देवमाणूस’ ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका आहे. मालिकेच्या कथानकामुळे ती नेहमी चर्चेत असते. त्यामध्ये अनेक लोकप्रिय कलाकार महत्त्वपूर्ण भूमिका साकारताना दिसत आहेत. मालिकेत मुख्य भूमिका साकारणारा अभिनेता किरण गायकवाड व इतर कलाकार सोशल मीडियावर यासंबंधित पडद्यामागचे व्हिडीओ, फोटो पोस्ट करत असतात. अशातच या मालिकेतील अभिनेत्रीने नुकताच एक व्हिडीओ शेअर केला आहे
‘देवमाणूस’ मालिकेतून लोकप्रिय अभिनेत्रीची नुकतीच एक्झिट झाली. गंगा हे पात्र साकारत प्रेक्षकांची पसंती मिळवणारी अभिनेत्री एकता डांगरने या मालिकेचा निरोप घेतला. मालिकेत तिचे पात्र असलेल्या गंगाचा शेवटी खून होतो, असे दाखवण्यात आलेलं. हा खून गोपाळ करतो, ज्याच्याबद्दल गंगाला सत्य माहीत असतं. त्यामुळे गंगाचा शेवट हे कथानकातील महत्त्वपूर्ण वळण होतं. या सीनसंबंधित काही व्हिडीओ अभिनेत्रीने पूर्वीसुद्धा शेअर केले होते. अशातच तिने हा मर्डर सीक्वेन्स कसा चित्रित करण्यात आलेला त्याबद्दलचा व्हिडीओ पोस्ट केला आहे.
गंगा म्हणजेच एकताने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर केलेल्या व्हिडीओमधून गोपाळ गंगाला कसे मारतो, तसेच हा सीन कसा शूट करण्यात आला हे पाहायला मिळते. रात्री अंधारात हा सीन शेतामध्ये चित्रित करण्यात आला असून, त्या संपूर्ण सीनसाठी पूर्ण तीन रात्री सलग शूटिंग केल्याचे अभिनेत्रीने सांगितले आहे. सीन करण्यापूर्वी किरण गायकवाड व एकता यांना सूचना देण्यात येत होत्या आणि त्यानुसार ते दोघे सीन करताना दिसतात.
‘देवमाणूस’मधील गंगाच्या एक्झिटचा सीन ‘असा’ झालेला शूट
एकता डांगरने शेअर केलेल्या व्हिडीओला तिने कॅप्शन देत याबद्दल सांगितलं आहे. ती म्हणाली, “आम्ही सलग तीन रात्री या मर्डर सीनचे शूटिंग करत होतो. आमच्या टीमचे खरेच कौतुक आहे. त्यांनी न थकता अन् झोपेची पर्वा न करता ही कामगिरी केली.”
एकता डांगरचं नेटकऱ्यांकडून कौतुक
एकताने शेअर केलेल्या या व्हिडीओखाली मालिकेतील गंगाच्या एक्झिटबद्दल नेटकऱ्यांनी कमेंट्स केल्या आहेत. त्यामध्ये एका नेटकऱ्याने “ते काही का असेना… पण गंगाला मारायला नाही पाहिजे होतं… गंगाच्या मर्डरनंतर दोन दिवस मला मालिका बघायची इच्छाच झाली नाही”, दुसऱ्याने “सुपर्ब अॅक्टिंग”, “तुझ्या एक्झिटनंतर मजा येत नाहीये आता मालिका बघायला. निदान स्वप्नात तरी दाखवलं पाहिजे तुला ‘देवमाणूस’मध्ये”, “तुम्ही खूप चांगला अभिनय केलात. मी फक्त तुमच्यासाठी ही मालिका बघते आणि मला तुम्ही खूप आवडता लव्ह यू दीदी” अशा स्वरूपाच्या प्रतिक्रिया पाहायला आहेत.

दरम्यान, एकता डांगरची ‘देवमाणूस’ मालिकेतून एक्झिट झाल्यानंतर ती आता कोणत्या नवीन भूमिकेतून प्रेक्षकांना पाहायला मिळणार याबद्दल तिच्या चाहत्यांमध्ये उत्सुक्ता असल्यचां पाहायला मिळतं.