Devmanus Fame Actress Shares Emotionla Post : ‘देवमाणूस – मधला अध्याय’ ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे. त्यामध्ये अनेक लोकप्रिय मराठी कलाकार महत्त्वपूर्ण भूमिका साकारत आहे. अशातच आता यातील एक अभिनेत्री मालिकेचा निरोप घेणार आहे.
किरण गायकवाडची मुख्य भूमिका असलेली ‘देवमाणूस’ ही मालिका प्रेक्षकांमध्ये चांगलीच चर्चेत असते. त्यात अभिनेते माधव अभ्यंकर, रुक्मिणी सुतार, एकता डांगर हे कलाकार आहेत. अशातच आता ‘देवमाणूस – मधला अध्याय’मध्ये गंगा हे पात्र साकारत सगळ्यांची पसंती मिळवणारी अभिनेत्री एकता डांगर मालिकेचा निरोप घेणार असल्याचं तिनं शेअर केलेल्या पोस्टमधून पाहायला मिळतं.
‘देवमाणूस’मधून एकता डांगरची होणार एक्झिट
एकता डांगरनं नुकतीच इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर केली असून, त्यामध्ये तिनं भावुक होत मालिकेचा निरोप घेणार असल्याचं म्हटलं आहे. तिनं शेअर केलेल्या पोस्टला, ‘ती होती गंगा… निडर, ती शेवटपर्यंत लढली, जिंकली आत्म्याने, मरण आलं तरी हरली नाही’, अशी कॅप्शन दिली आहे. यावेळी तिने व्हिडीओ शेअर करीत त्याला ‘फायनल रिडिंग फॉर गंगा’ अशीही कॅप्शन दिल्याचे दिसते.
एकताने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये ती गंगा म्हणून शेवटचा संवाद साधताना दिसते. यावेळी ती गोपाळचा उल्लेख करीत म्हणते, “तो ट्रॅक्टर पुन्हा रिव्हर्स घेतो आणि ट्रॅक्टर तिच्यावरून नेऊन तिला चिरडतो. ती आता त्याच्यासमोर रक्ताची उलटी करते. तिच्यामध्ये अजूनही जीव आहे आणि तिच्यासमोर तिला गोपाळ दिसतो. त्याच्याबरोबरचं संसाराचं स्वप्न, त्याच्याबरोबर पळून जाण्यासाठी केलेले प्रयत्न तिला आठवतात. तिचा जीव अजूनही गेलेला नाहीये. तो तिच्यावरून ट्रॅक्टर नेतो आणि गंगा जीव सोडते…”
एकता व्हिडीओच्या शेवटी म्हणते, “मला अभिमान आहे. गंगा मालिकेत जरी तुझा शेवट होत असला तरी प्रेक्षकांच्या मनात तू कायम असशील.” एकता डांगर हिनं गेले अनेक दिवस या मालिकेत गंगाचं पात्र साकारत प्रेक्षकांची पसंती मिळवली. आता तिच्या पात्राचा शेवट होणार असल्याचं पाहायला मिळतं आहे. यानंतर आता मालिकेत अजून काय घडणार हे येणाऱ्या भागातच समजेल.
एकताबद्दल बोलायचं झालं, तर ‘देवमाणूस’पूर्वी ती ‘झी मराठी’वरील ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ या मालिकेतून झळकलेली. त्यामध्ये तिनं महत्त्वपूर्ण भूमिका साकारली होती. त्यातील तिच्या भूमिकेलाही प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळालेला. अभिनेत्री तितीक्षा तावडेची मुख्य भूमिका असलेल्या या मालिकेनं काही महिन्यांपूर्वी प्रेक्षकांचा निरोप घेतला. त्यानंतर एकता पुन्हा ‘झी मराठी’वर ‘देवमाणूस’ मालिकेतून पाहायला मिळाली. आता त्यातूनही ती निरोप घेत असून, एकता पुढे कोणत्या नवीन भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार हे पाहणं रंजक ठरेल.