‘साथ निभाना साथिया’ मालिकेत ‘गोपी बहू’ ही भूमिका करून अभिनेत्री देवोलीना भट्टाचार्जी लोकप्रिय झाली. देवोलीना सध्या छोट्या पडद्यापासून दूर आहे. ७ महिन्यांपूर्वी ती आई झाली आणि ती तिच्या मुलाबरोबर वेळ घालवत आहे. देवोलीना बरेचदा तिच्या मुलाचे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर करत असते.

नुकतेच तिने मुलाचे काही फोटो पोस्ट केले होते. या पोस्टवर ट्रोलर्सनी देवोलीनाच्या मुलाच्या रंगाबद्दल घाणेरड्या कमेंट्स केल्या होत्या. यामुळे संतापलेल्या अभिनेत्रीने या ट्रोलर्सची सायबर क्राइमला तक्रार केली आहे. तिने ट्रोलर्सनी केलेल्या कमेंट्सचे स्क्रीनशॉट स्टोरीवर पोस्ट केले आहेत.

देवोलीना भट्टाचार्जीने सायबर क्राइम इंडियाच्या अधिकृत अकाउंटवर झालेल्या संभाषणाचा स्क्रीनशॉट पोस्ट केला आहे. यात तिने वाईट कमेंट्स करणाऱ्यांविरोधात अधिकाऱ्यांची मदत मागितली आहे. तसेच ज्या लोकांनी तिच्या पेजवर कमेंट्स केल्या होत्या, त्यांच्याबरोबरच्या चॅटचे स्क्रीनशॉट्सही पोस्ट केले. ‘देवोलीनाचा मुलगा बाबावर गेलाय,’ अशा कमेंट्स काही ट्रोलर्सनी केल्या होत्या.

देवोलीना भट्टाचार्जीने केली तक्रार

देवोलीनाने एका पोस्टमध्ये लिहिलं, “आता काय बोलावं. ८,९०० कमेंट्स. यापैकी दोन हजार कमेंट्स वाईट आहे असं गृहित धरलं तरी सात हजार सकारात्मक कमेंट्स आहेत. माझ्या मुलाला प्रेम, आशीर्वाद दिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार. तुमच्या या कमेंट्स महत्त्वाच्या आहेत. तसेच मला सर्वच महिलांना एक विनंती करायची आहे की अशा ट्रोलर्सच्या विरोधात बोला. खासकरून जेव्हा ते तुमच्या मुलांबद्दल बोलतात. अशा लोकांविरोधात ठामपणे उभे राहा. मला बरंच काही लिहायचंय, पण आता मी भारावले आहे. मला असं वाटतंय जणू मी एखादं युद्ध जिंकलंय. पुन्हा तुम्हा सर्वांचे आणि इंडियन सायबर पोलिसांचे आभार.”

devoleena bhattacharjee baby troll
देवोलीना भट्टाचार्जीने केलेल्या पोस्ट (सौजन्य – स्क्रीनशॉट)

चाहत्यांनी देवोलीनाला दिला पाठिंबा

“एका सात महिन्यांच्या मुलाबद्दल अशा कमेंट्स करायची त्यांची हिंमतच कशी झाली?” असं एका चाहत्याने लिहिलं. तर एका युजरने अशा प्रकारे ट्रोलर्सची तक्रार केल्याबद्दल तिचं कौतुक केलं. गरज पडेल तिथे मुलासाठी आईने ठामपणे उभं राहायला हवं, असं देवोलीना म्हणाली.

देवोलीना भट्टाचार्जीचे लग्न

देवोलीनाने भट्टाचार्जीने डिसेंबर २०२२ मध्ये जिम ट्रेनर शानवाज शेख याच्याशी साधेपणाने लग्न केलं. या जोडप्याने लग्नानंतर दोन वर्षांनी डिसेंबर २०२४ मध्ये पहिल्या बाळाचं स्वागत केलं. त्यांच्या मुलाचं नाव जॉय आहे. तो सात महिन्यांचा आहे.