Dhananjay Powar’s Daughter Singing Video : ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वामुळे कोल्हापुरचा धनंजय पोवार घराघरांत लोकप्रिय झाला. रीलस्टार व सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर म्हणून त्याला सर्वत्र ओळखलं जातं. धनंजयला सगळे प्रेमाने डीपी दादा म्हणतात. कोल्हापुरच्या या डीपी दादाला ‘बिग बॉस’च्या घरात चाहत्यांचं भरभरून प्रेम मिळालं होतं. यामुळेच धनंजय या शोच्या महाअंतिम सोहळ्यापर्यंत पोहोचला होता.

‘बिग बॉस’ संपून आता एक वर्ष झालंय, तरीही डीपी दादाची लोकप्रियता घराघरांत कायम आहे. धनंजय सोशल मीडियावर खूपच सक्रिय असतो. विशेषत: त्याचे कौटुंबिक व्हिडीओ पाहायला त्याच्या चाहत्यांना प्रचंड आवडतं. डीपीच्या डेली व्लॉग्समध्ये त्याची पत्नी, आई-बाबा, मुलगा व धाकटी लेक जान्हवी या सगळ्यांची झलक पाहायला मिळते.

डीपी दादाची मुलगी जान्हवी खूपच हुशार आहे. तिला गायनाची आवड आहे, धनंजयने नुकताच जान्हवीचा एक खास व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. यामध्ये डीपी दादाची लाडकी लेकी “तू आभाळ” हे गाणं गात असल्याचं पाहायला मिळत आहे. छोट्या जान्हवीचा सुमधूर आवाज ऐकून चाहत्यांनी या व्हिडीओवर कौतुकाचा वर्षाव केला आहे.

“तुमच्यासारखी मोठी होऊदे, खूप नाव करुदेत कमाल बाळा किती छान गाणं गातेस”, “आवाज सुंदर आहे”, “दादा या गाण्याचा पूर्ण व्हिडीओ युट्यूबवर शेअर करा”, “कसला भारी आवाज आहे राव पोरीचा, जबरदस्त!” अशा प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी या व्हिडीओच्या कमेंट्समध्ये दिल्या आहेत.

जान्हवी या व्हिडीओमध्ये “तू आभाळ-आभाळ वादळ तुझं तू राजा अस्मानीचं बळ दाव जी…” हे ‘येक नंबर’ सिनेमातील गाणं गात आहे. हे मूळ गाणं जावेद अली आणि रवींद्र खोमणे यांनी गायलं असून याला अंकिता वालावलकरचा पती कुणाल भगत आणि त्याचा मित्र करण यांनी संगीत दिलं आहे.

जान्हवीने ‘तू आभाळ’ गाणं गायल्यावर यावर कुणालने लव्ह इमोजी कमेंट करत तिचं कौतुक केलं आहे. दरम्यान, धनंजयच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं, तर ‘बिग बॉस मराठी’नंतर डीपी ‘स्टार प्रवाह’च्या ‘शिट्टी वाजली रे’ कार्यक्रमात झळकला होता. याशिवाय त्याचे दैनंदिन युट्यूब व्हिडीओ ( Daily Vlogs ) व रील्सना चाहत्यांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे.