Dhananjay Powar 12th Percentage & Marks : ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वामुळे धनंजय पोवार घराघरांत लोकप्रिय झाला. रीलस्टार व सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर म्हणून त्याला सर्वत्र ओळखलं जातं. कोल्हापुरच्या डीपी दादाला ‘बिग बॉस’च्या घरात चाहत्यांचं भरभरून प्रेम मिळालं होतं. यामुळेच धनंजय या शोच्या महाअंतिम सोहळ्यापर्यंत पोहोचला होता. अंतिम फेरीत त्याच्या एव्हिक्शननंतर चाहते प्रचंड नाराज झाले होते.
आता धनंजय पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. यामागे कारणही खूपच खास आहे. डीपी दादा सोशल मीडियावर खूपच सक्रिय असतो, याच माध्यमांतून तो चाहत्यांच्याही संपर्कात राहतो. नुकतंच त्याने इन्स्टाग्रामवर ‘आस्क मी सेशन’ घेतलं. यावेळी धनंजयने चाहत्यांच्या विविध प्रश्नांना दिलखुलासपणे उत्तर दिली.
धनंजयला एका चाहत्याने तुम्हाला बारावीत किती गुण मिळाले होते? असा प्रश्न विचारला. यावर डीपी म्हणाला, “३५,३५, ३५, ३५, ३५, ३५….साधा माणूस नाहीये मी… प्रत्येक विषयात ३५ गुण मार्क्स मिळावेत यासाठी ७ महिने अभ्यास केला होता.” याशिवाय काही चाहत्यांना विश्वास बसणार नाही यासाठी डीपीने त्याचं बारावीतील मार्कशीट देखील सोशल मीडियावर शेअर केलं आहे.
धनंजयने शेअर केलेल्या फोटोमध्ये त्याचं नाव, ६ विषयांमध्ये मिळालेले ३५ गुण स्पष्टपणे दिसत आहे. आता प्रत्येक विषयात ३५ गुण मिळवल्यामुळे डीपीला बारावीत ३५ टक्के मिळाल्याचं स्पष्ट झालं आहे. धनंजयला सगळ्या विषयात एकसारखे गुण मिळाल्याचं पाहून अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे. त्याची ही बारावीची मार्कशीट सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
याशिवाय धनंजयला दुसऱ्या एका नेटकऱ्याने, “तुमचं वय २४ आहे म्हणतात पण, मला २६-२७ वाटतंय” असा मिश्किल प्रश्न विचारला होता. यावर डीपीने माझं वय ४० वर्ष आहे असं सांगितलं.

दरम्यान, धनंजय पोवार नेहमीच त्याच्या चाहत्यांशी दिलखुलासपणे संवाद साधताना दिसतो. ‘बिग बॉस मराठी’नंतर डीपी ‘स्टार प्रवाह’च्या ‘शिट्टी वाजली रे’ कार्यक्रमात झळकला होता. याशिवाय त्याचे दैनंदिन युट्यूब व्हिडीओ ( Daily Vlogs ) व रील्सना चाहत्यांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे.