Dhanashree Verma On Social Media Trolling : सोशल मीडियावर सतत चर्चेत असलेल्या जोडीपैकी एक म्हणजे भारतीय क्रिकेटपटू युजवेंद्र चहल आणि त्याची एक्स पत्नी धनश्री वर्मा. चहलपासून घटस्फोट घेतल्यानंतर, धनश्रीला सोशल मीडियावर ‘गोल्ड डिगर’ असे संबोधून ट्रोल केले जात आहे. मात्र आता तिने या ट्रोलिंगकडे फारसे लक्ष न देण्याचा निर्णय घेतल्याचं म्हटलं आहे.
सध्या धनश्री अश्नीर ग्रोव्हरच्या ‘Rise and Fall’ या रिअॅलिटी शोमध्ये दिसत आहे. या शोमध्ये तिने विभक्त झाल्यानंतरच्या ट्रोलिंगवर मौन बाळगण्याचा निर्णय का घेतला, हे सांगितलं. इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार, धनश्री म्हणाली की, त्यांच्या घटस्फोटाला माध्यमांमध्ये खूपच मोठं स्वरूप मिळालं आणि अनावश्यक चर्चाही झाली.
यावेळी धनश्री असं म्हणाली, “मी काही गोष्टींवर अजिबात बोलायचं ठरवलं नव्हतं. दोन व्यक्तींमधलं नातं असतं, त्यात काहीवेळा भांडणं होतात. मग एकजण म्हणतो, ‘हे नातं इथेच थांबवूया.’ ठीक आहे. मग तिथेच थांबायला हवं ना? पुढे नवे मुद्दे का तयार करायचे? प्रत्येकाला आपला सन्मान राखावा लागतो आणि एखाद्या नात्यात असताना, समोरच्या व्यक्तीचाही आदर राखणं गरजेचं असतं.”
यानंतर ती म्हणाली, “मीही त्याचा अपमान करू शकले असते. तुम्हाला वाटत नाही का, की माझ्याही भावना आहेत? मी एक स्त्री आहे. मलाही काही गोष्टी बोलायच्या असतीलच! पण तो माझा पती होता. मी त्याच्याबरोबर नात्यात असताना त्याचा सन्मान केला आणि मी त्याच्याशी लग्न केलं होतं, म्हणून तो सन्मान राखणं आवश्यक आहे असं मला वाटतं.”
यानंतर धनश्री म्हणते, “जर एखाद्याला स्वतःला चांगलं दाखवायचं असेल, तर ते तुमच्या वागणुकीतून आणि कामातून दिसलं पाहिजे. दुसऱ्याला बदनाम करून स्वतःची प्रतिमा स्वच्छ दाखवण्याची गरज नसते. मी प्रेमाबद्दल नकारात्मक झालेय असं नाही. तो शब्द जरा जड आहे. पण खरं सांगायचं तर, आता मला प्रेमात काही रस नाही.”
दरम्यान, Rise and Fall या शोच्या एका प्रोमोमध्येही धनश्रीने तिला ‘गोल्ड डिगर’ म्हणत ट्रोल करणाऱ्यांबद्दल खुमासदार प्रतिक्रिया दिली होती. शोच्या प्रोमोमध्ये, अर्जुन बिजलानीने तिला “मला डायमंड, सिल्वर काही जमत नाही. मला फक्त गोल्डच शोभतं” असं म्हटलं होतं. तेव्हा धनश्रीने मजेशीर उत्तर देत म्हणालेली, “ही ओळ मी म्हणू शकत नाही. कारण जर मी हे म्हणाले, तर जे प्रेम मिळणार आहे, ते सुद्धा मिळणार नाही.”
धनश्री वर्मा इन्स्टाग्राम पोस्ट
तर राज शमानीबरोबरच्या संवादात, युजवेंद्र चहलने “Be your own sugar daddy” हा टी-शर्ट घालण्यामागचं कारण सांगितलं होतं. याबद्दल तो म्हणालेला, “मला एक मेसेज द्यायचा होता आणि मी तो दिला. कारण समोरून काहीतरी झालं होतं… आधी मी असं काही करायचं ठरवलं नव्हतं, पण नंतर जे काही घडलं, त्यानंतर मी ठरवलं की आता कोणी काय म्हणतं याने काही फरक पडत नाही. मी माझ्या मनाप्रमाणे वागणार.”