अभिनेत्री दिशा परदेशी हिने काही दिवसांपूर्वीच ‘झी मराठी’वरील ‘लाखात एक आमचा दादा’ मालिकेतून निरोप घेतला. यानंतर तिला अनेकांनी मालिका सोडण्यामागचं कारण विचारलं; यावर तिने आरोग्याच्या समस्यांमुळे मालिका सोडल्याचं म्हटलं होतं. अशातच नुकतीच तिने ‘राजश्री मराठी शोबझ’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये याबाबत खुलासा केला आहे.
‘राजश्री मराठी शोबझ’ला दिलेल्या मुलाखतीत तिने तिला यू.टी.आय. (UTI) हा आजार झाल्याचं सांगितलं आहे. या आजारामुळे तिच्या आरोग्यावर परिणाम झाल्याने तिला डॉक्टरांनी आरामाचा सल्ला दिला होता, ज्यामुळे तिला मालिका सोडणं भाग होतं. मालिका करताना तब्येतीकडे लक्ष देता येत नसल्याने शेवटी तिने ही मालिका सोडण्याचा निर्णय घेतल्याचं म्हटलं आहे.
दिशाला या मुलाखतीमध्ये पुढे “जेव्हा मुख्य भूमिका साकारणारे कलाकार मालिका सोडतात तेव्हा त्यांची काही कारणं असू शकतात, पण गैरसमजही अनेकदा होऊ शकतो आणि वेगवेगळ्या अफवासुद्धा बाहेर येतात, नखरे करताता याबद्दल बोललं जातं, नवीन काम मिळालं आहे म्हणून सोडली असं बरंच काही होत असतं, तू कधी याचा समाना केला आहेस का”, असा प्रश्न विचारण्यात आला. यावर दिशाने “हे माझ्याबरोबर झालं आहे.” असं म्हटलं. तिला झालेल्या आजारामुळे ती स्वत:ची काळजी घेत होती. याबद्दल बोलताना तिने तिच्याबद्दल कशा अफवा पसरवल्या गेल्या ते सांगितलं आहे.
दिशा म्हणाली, “जेव्हा मी सांगायचे की मला फक्त वरण द्या किंवा वरणाचं फक्त पाणी द्या, त्यात जास्त मसाला टाकू नका, तेव्हा ते असं झालं की, हिचे नखरे सुरू झाले. माझ्या एकटीसाठी वेगळं जेवण नाही येणार. जर मला जेवण बाहेरून ऑर्डरही करायचं असेल तर ते दुर्गम क्षेत्र असल्याने यासाठी खूप वेळ जायचा. मालिकेचं शूटही खूप हेकटिक असल्याने आम्हाला स्वत:ची काळजी घेण्यासाठी पुरेसा वेळ मिळत नाही, त्यामुळे सगळंच बदलतं आणि त्यामुळेच मी आजारी पडले आणि तेव्हा मी काही वेगळं मागायला जायचे तर ज्यांना माझ्या आजाराबद्दल माहिती आहे ते समजून घ्यायचे, पण बाकीचे हिची नाटकं सुरू झाली असं म्हणायचे.”
दरम्यान, दिशा पुढे तिच्या तब्येतीबद्दल अपडेट देत म्हणाली, ”आता मी बरी आहे आणि मी काम सुरू केलं आहे, त्यामुळे मी खूप आनंदी आहे.” पुढे तिला तू एक मोठा प्रोजेक्ट करत आहेस असं विचारण्यात आलं. यावर तिने “एक नाही, असे तीन-चार आहेत. मी जेव्हा बाहेर पडले तेव्हा मला मालिका सोडल्याची खंत होती, पण मला खूप लोकांचे फोन आले आणि त्यांनी प्रोजेक्टसाठी विचारलं आणि आता तर एका प्रोजक्टचं शूटिंग सुरू झालं आहे”, असं तिने म्हटलं आहे.