Dnyanada Ramtirthkar Shared A Post : ज्ञानदा रामतीर्थकर मराठी मालिकाविश्वातील लोकप्रिय चेहरा आहे. सध्या अभिनेत्री लोकप्रिय मालिका ‘लग्नानंतर होईलच प्रेम’मध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारत आहे. त्यातील तिच्या भूमिकेने अनेकांची पसंती मिळवली आहे. ज्ञानदा यासह सोशल मीडियावरही सक्रिय असते. अशातच अभिनेत्रीने नुकतीच खास पोस्ट शेअर केली आहे.

ज्ञानदा सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते आणि त्यामार्फत ती तिच्या कामासंदर्भातील अपडेट, सेटवरील गमती-जमती सोशल मीडियावर शेअर करीत चाहत्यांच्या संपर्कात राहत असते. अशातच अभिनेत्रीने आता नुकतीच एक खास पोस्ट शेअर केली आहे. तिने इन्स्टाग्रामवर तिच्या मैत्रिणीच्या वाढदिवसानिमित्त पोस्ट शेअर करीत तिला शुभेच्छा दिल्या आहेत. यावेळी तिने तिच्या मैत्रिणीबरोबरचे काही खास फोटोही पोस्ट केलेले पाहायला मिळत आहेत.

ज्ञानदा रामतीर्थकरने जिवलग मैत्रिणीला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

ज्ञानदाने सोशल मीडियावर तिची मैत्रीण व अभिनेत्री अश्विनी कुलकर्णीसाठी पोस्ट शेअर केलीये. या पोस्टला तिने खास कॅप्शनही दिली आहे. तिने यावेळी लिहिलं आहे, “तुझ्याबद्दल लिहिण्यासाठी खूप काही आहे; पण तुला सगळंच माहीत आहे. गेली नऊ वर्षं आपण एकमेकींना ओळखत आहोत. एकमेकींच्या पाठींशी खंबीरपणे उभ्या आहोत. एकमेकींना पाठिंबा देत आहोत. तू माझ्या आयुष्यात आहेस यासाठी मी स्वत:ला भाग्यवान समजते. वाढदिवसाच्या शुभेच्छा जिगर”.

ज्ञानदाच्या या पोस्टखाली तिची मैत्रीण अश्विनीनेही ‘लव्ह यू बेबी, खूप खूप प्रेम’, अशी कमेंट केल्याचे पाहायला मिळत आहे. ज्ञानदाने यावेळी तिच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘मुंबई लोकल’ या चित्रपटाच्या प्रीमियरदरम्यानचे मैत्रिणीबरोबरचे फोटो पोस्ट केले आहेत. ज्ञानदाचा हा चित्रपट १ ऑगस्ट रोजी प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाच्याच प्रीमियरला तिची जिवलग मैत्रिण अश्विनीनंही हजेरी लावल्याचं अभिनेत्रीनं शेअर केलेल्या फोटोंमधून कळतंय.

ज्ञानदा गेली अनेक वर्षं इंडस्ट्रीत काम करीत असून, अभिनेत्री अश्विनी कुलकर्णी तिची खूप जुनी मैत्रीण असल्याचं तिनं शेअर केलेल्या पोस्टमधून कळतं. गेली काही वर्षं या दोघी एकमेकींच्या संपर्कात असून, दोघींमध्ये घट्ट मैत्री निर्माण झाली आहे.