Dr. Nilesh Sabale In Star Pravah Show : स्टार प्रवाहवरील ‘शिट्टी वाजली रे’ हा कार्यक्रम गेल्या तीन महिन्यांपासून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. अल्पावधीतच या कार्यक्रमाने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. या कार्यक्रमात गौतमी पाटील, धनंजय पोवार, घन:श्याम दरवडे, निक्की तांबोळी, विनायक माळी यांसारख्या सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्सबरोबरच वाहिनीवरील मालिकांमधील कलाकारांनी त्यांचं पाककौशल्य दाखवलं.
या कार्यक्रमात अभिनेता अमेय वाघ हा या कार्यक्रमाचा सूत्रसंचालक आहे; तर शेफ जयंती कठाळे या परीक्षक आहेत. नानाविध प्रकारचे पदार्थ बनवतानाची कलाकारांची होणारी तारांबळ आणि त्याचबरोबरीने त्यांची धमाल, मज्जा आणि मस्ती या कार्यक्रमातून प्रेक्षकांना पाहायला मिळाली.
‘शिट्टी वाजली रे’ हा कार्यक्रम यावर्षी २६ एप्रिल रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला. मात्र आता हा कार्यक्रम प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. नुकताच कार्यक्रमाच्या महाअंतिम सोहळ्याचा प्रोमो समोर आला आहे आणि पुढील आठवड्यात महाअंतिम सोहळा होणार असल्याची माहिती याद्वारे देण्यात आली आहे.
या कार्यक्रमाच्या महाअंतिम सोहळ्यात डॉ. निलेश साबळे सहभागी होणार असून याचा प्रोमो समोर आला आहे. या प्रोमोमध्ये डॉ. निलेश साबळेला पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्काच बसला आहे. निलेश साबळे आणि सिद्धार्थ जाधव यांच्या विशेष उपस्थितीत ‘शिट्टी वाजली रे’चा महाअंतिम सोहळा पार पडणार आहे.
‘शिट्टी वाजली रे’ महाअंतिम सोहळा प्रोमो
निलेश साबळेसह शशांक केतकर, सुपर्णा श्याम, तेजस्विनी लोणारी, ईशा केसकर, अक्षर कोठारी, छोटा पुढारी हेही या प्रोमोमध्ये दिसत आहे. या प्रोमोमध्ये डॉ. निलेश साबळे पदार्थ बनवताना दिसत आहे. तसंच शशांक, सिद्धार्थ आणि अमेय यांच्याबरोबर डान्स करत असल्याचंही पाहायला मिळत आहे.
दरम्यान, डॉ. निलेश साबळेच्या कामाबद्दल बोलायचं झालं, तर झी मराठीवरील ‘चला हवा येऊ द्या’ या शोच्या माध्यमातून तो प्रेक्षकांच्या भेटीला आला. या कार्यक्रमाने जवळपास दहा वर्षे प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. यानंतर तो कलर्स मराठीवरील ‘हसताय ना? हसायलाच पाहिजे’ शोमधून प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. त्यानंतर आता तो स्टार प्रवाहवरील ‘शिट्टी वाजली रे’ या कार्यक्रमातून पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर येत आहे.