मराठी कलाविश्वात सध्या लगीनघाई सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. ‘कोकण हार्टेड गर्ल’ अंकिता वालावलकर, ‘लक्ष्मी निवास’ फेम दिव्या पुगावकर यांच्या पाठोपाठ सध्या आणखी एका अभिनेत्रीच्या घरी लग्नाची तयारी सुरू आहे. या अभिनेत्रीचं नाव आहे सुकन्या काळण. अभिनेत्री असण्याबरोबरच ती उत्तम डान्सर म्हणून देखील ओळखली जाते. ‘एका पेक्षा एक’ या डान्सिंग शोमध्ये सुकन्या स्पर्धक म्हणून सहभागी झाली होती आणि या शोमुळेच ती नावारुपाला आली.

गेल्यावर्षी सुकन्याचा साखरपुडा थाटामाटात पार पडला होता. यानंतर अभिनेत्री लग्नबंधनात केव्हा अडकणार याची चाहते आतुरतेने वाट पाहत होते. अखेर सुकन्याच्या घरी आता लग्नाआधीच्या विधींना सुरुवात झाली असून, नुकताच तिचा मेहंदी व हळदी सोहळा पार पडला.

सुकन्या काळणच्या हळदी समारंभातील व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सुकन्याच्या होणाऱ्या नवऱ्याचं नाव रोशन मरार असं आहे. त्यामुळेच लग्नातील फोटो आणि व्हिडीओवर अभिनेत्रीने कन्याहुईरोशन’ हा विशेष हॅशटॅग वापरल्याचं पाहायला मिळत आहे.

सुकन्याने हळदी समारंभाला पिवळ्या रंगाची साडी नेसली होती. मुंडावळ्या, हातात हिरव्या बांगड्यांचा चुडा, फुलांचे दागिने या नववधूच्या लूकमध्ये सुकन्या अतिशय सुंदर दिसत होती. हळद लागल्यावर तिने होणाऱ्या नवऱ्यासह डान्स केल्याचं व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे. आता सुकन्या आणि रोशन लवकरच विवाहबंधनात अडकणार आहेत.

View this post on Instagram

A post shared by Suyash Tilak (@suyashtlk)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, सुकन्याच्या कामाबद्दल सांगायचं झालं, तर ‘एका पेक्षा एक’ या सचिन पिळगावकरांच्या रिअ‍ॅलिटी शोमधून सुकन्या काळण घराघरांत लोकप्रिय झाली. रिअ‍ॅलिटी शो केल्यानंतर तिने अभिनय क्षेत्राकडे आपलं पाऊल वळवत अनेक लोकप्रिय मालिकांमध्ये महत्त्वाच्या भूमिका साकारल्या. आता लवकरच सुकन्या ‘द दमयंती दामले’ या नाटकात महत्त्वपूर्ण भूमिका साकारताना दिसणार आहे. फेब्रुवारी महिन्यात या नाटकाचे शुभारंभाचे प्रयोग पार पडणार आहेत. याशिवाय सुकन्याने ‘मर्डरवाले कुलकर्णी’ या नाटकात सुद्धा काम केलेलं आहे.