Marathi Actor And Singer Beach Cleanup Initiative : देशभरासह राज्यभरात नुकताच गणेशोत्सव हा सण मोठ्या आनंदाने आणि उत्साहात पार पडला. दहा दिवस भक्तीभावाने पूजा केलेल्या लाडक्या बाप्पााला अनंत चतुर्दशीला भाविकांनी निरोप दिला. सार्वजनिक मंडळांसह घरगुती गणपतीही विसर्जित करण्यात आले. लाडक्या बाप्पाचं गणेशभक्तांनी मुंबईतील विविध समुद्रकिनाऱ्यांवर विसर्जन केलं.

यादरम्यान, बाप्पांच्या विसर्जनाबरोबरच मोठ्या प्रमाणात निर्माल्य समुद्रात टाकण्यात आले. त्यामुळे समुद्रकिनारे प्रदुषित झाले. त्यामुळे या समुद्रकिनाऱ्यांच्या स्वच्छतेसाठी अनेक स्वयंसेवी संस्थांकडून स्वच्छता मोहिम राबवण्यात आली. यापैकीच एक संस्था म्हणजे ‘रजनी फाउंडेशन’. या संस्थेअंतर्गत विसर्जनानंतर मुंबईतील समुद्रकिनारे स्वच्छ करण्यात आले.

रजनी फाउंडेशनच्या या स्वच्छता मोहिमेत अभिनेता, गायक उत्कर्ष शिंदे हादेखील सहभागी झाला होता. यावेळी अभिनेत्याने स्वत:च्या हाताने मुंबईतील समुद्रकिनारे स्वच्छ करण्यासाठी मदत केली. याचबद्दल उत्कर्षने त्याची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. एबीपी माझा वाहिनीद्वारे शेअर केलेला व्हिडीओ त्याने आपल्या सोशल मीडियावर शेअर केला आहे.

या व्हिडीओमध्ये उत्कर्ष असं म्हणतो, “गणपती उत्सव असो किंवा इतर कोणतेही सण-समारंभ करताना आपण हा विचार केला पाहिजे की, आपल्या स्वत:ला किंवा निसर्गाला हानी पोहोचणार नाही. सण हे सणासारखेच साजरे व्हायला पाहिजेत. यामुळे आपल्याला नंतर सहन करावं लागेल असं करू नये. सण म्हटलं की, संस्कृती येते. संस्कृती म्हटली की संस्कार येतात आणि संस्कृती जपताना आपण दुसऱ्याला त्रास देत नाही.”

यानंतर त्याने सांगितलं, “संस्कृती जपायची असते, ज्यामुळे आपला अभिमान आणि स्वाभिमान टिकून राहील. तसंच आपलं जगभरातलं कर्तुत्व दिसत राहील. याच उद्देशाने रजनी फाउंडेशनने समुद्र स्वच्छ केला आहे. मीसुद्धा माझ्या चाहत्यांना सांगेन की, आपल्या पुढील भविष्यासाठी आपल्याला वर्तमान सुंदर करावा लागेल. तरच पुढच्या पिढीला हा देश, हा परिसर सुंदर दिसेल आणि अनुभवायला मिळेल. नाहीतर आपण बघतोच आहोत की, आपल्या दहा वर्षांपूर्वी जे वातावरण होतं, ते आता नाहीय. त्याचं कारण आपण आपला परिसर, निसर्ग जपावा लागेल.”

उत्कर्ष शिंदे इन्स्टाग्राम पोस्ट

या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये उत्कर्ष असं लिहितो, “सण आपले… तर जबाबदारी पण आपलीच… आजच्या पिढीने येणाऱ्या नव्या पिढ्यांना दूषित वातावरण, उद्ध्वस्त केलेले किनारे, समतोल नसलेला निसर्ग द्यायचा आहे की, एकत्र येऊन मोकळा श्वास, नयनरम्य निसर्ग, सुंदर परिसर, सुदृढ आयुष्य द्यायचं? याचा विचार करायलाच हवा. आपण संस्कृतीही जपूया आणि आपलं पर्यावरणदेखील. उद्याच्या भवितव्यासाठी आज लढूया.”