Gaurav More : विनोदाचं अचूक टायमिंग साधून आपल्या चाहत्यांना खळखळून हसवणारा अभिनेता म्हणजेच गौरव मोरे. गेल्या काही दिवसांपासून सर्वांचा लाडका ‘फिल्टरपाड्याचा बच्चन’ ‘चला हवा येऊ द्या’ या शोमुळे चर्चेत आहे. गौरव आजच्या घडीला स्टार असला तरीही एक काळ असा होता जेव्हा त्याने अतिशय कष्ट करून दिवस काढले आहेत. तेव्हा केलेल्या मेहनतीची जाणीव त्याला आजही आहे. त्यामुळे गौरव कायम ट्रोलर्सकडे दुर्लक्ष करून आपलं काम अधिक चांगलं कसं फुलवता येईल याकडे लक्ष देतो.

‘चला हवा येऊ द्या’च्या मंचावर एका स्किटच्या माध्यमातून गौरवचा प्रवास उलगडण्यात येणार आहे. स्किट सादर करणारे स्पर्धक म्हणतात, “गौरव मोरे व्हायचं असेल तर खूप अपमान सहन करावा लागतो…त्याच्यासाठी जिगरा लागतो आणि तो जिगरा त्याच्याकडे आहे. गौरव मोरे दहा बाय दहाच्या खोलीत राहिलेला एक साधा मुलगा आहे आणि आज कष्ट करून तो स्टार होतोय. कारण, गौरव मोरे बनायला वाघाचं काळीज लागतं. खोटे-खोटे सोड रे…खरे अपमान सुद्धा पचवावे लागतात.”

यानंतर ‘चला हवा येऊ द्या’चा होस्ट अभिजीत खांडकेकर गौरवचं कौतुक करत त्याला मिठी मारतो. यावेळी अभिजीत आणि श्रेया बुगडे भावुक झाल्याचं पाहायला मिळालं. अभिजीत म्हणतो, “आपल्याला जरा कोणी काही बोललं की, मनाला लागतं…आपला इगो हा कायम मोठा असतो. पण, हे सगळं बाजूला ठेऊन केवळ सगळ्यांचं मनोरंजन करणं…हे मात्र तूच करू शकतोस गौरव…तुला मनापासून हॅट्स ऑफ आहे.”

अपमान पचवतो कारण…“, गौरव मोरे म्हणाला…

गौरव मोरे म्हणाला, “तुम्ही आता म्हणालात की, गौरव अपमान पचवतो वगैरे या सगळ्या गोष्टी मला मान्य आहेत. कारण, मी कायम माझ्या डोक्यात एक गोष्ट ठरवलेली असते ती म्हणजे, आपला जन्म एकदाच होतो. आज कोणी मस्करी करेल तर ती हसतखेळत घेऊयात. समोरच्या व्यक्तीला आपला चांगला मित्र बनवुयात आणि पुढे जाऊयात. या एका जन्मात आपण आपल्या मनात रुसवे-फुगवे ठेवून जगायचं याला काहीच अर्थ नाहीये. मलाही केव्हातरी वाईट वाटतं पण, मी असा विचार करतो जाऊदेत ना…उद्याचा नवीन दिवस आहे तो जगूयात. काल घडलेल्या गोष्टी, मनावरचं ओझं दूर करून प्रत्येक दिवसाची नव्याने सुरुवात करुयात.”

दरम्यान, ‘झी मराठी’ने याचा प्रोमो शेअर करत ‘जगाला हसवणारा गौऱ्या’ असं कॅप्शन दिलं आहे. नेटकऱ्यांनी सुद्धा या प्रोमोच्या कमेंट्समध्ये भावना व्यक्त केल्या आहेत. “गौरव दादाचं मन खूप मोठं आहे आणि तो आम्हाला आमच्यातला वाटतो” अशा प्रतिक्रिया यावर चाहत्यांनी दिल्या आहेत.