‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या लोकप्रिय कार्यक्रमातून महाराष्ट्राच्या घराघरांत पोहोचलेला अभिनेता म्हणजे गौरव मोरे. ‘पवईचा फिल्टर पाड्याचा बच्चन’ म्हणून त्याने आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. आपल्या विनोदाच्या अनोख्या शैलीने त्याने अवघ्या महाराष्ट्रातील प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे. त्यानंतर मध्यंतरी त्याने या शोमधून निरोप घेतला. त्याचे अनेक चाहते त्याला आजही या शोमध्ये मिस करतात.
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’नंतर गौरव मोरे ‘मॅडनेस मचाएंगे’ या हिंदी कॉमेडी शोमध्येही सहभागी झाला होता. अशातच आता पुन्हा एकदा छोट्या पडद्याद्वारे प्रेक्षकांचं मनोरंबजन करण्यासाठी सज्ज होत आहे. अभिनेता ‘चला हवा येऊ द्या’च्या दुसऱ्या सीझनमधून पुन्हा एकदा प्रेक्षकांचं मनोरंजन करणार आहे. याशोध्ये तो मेंटोरच्या भूमिकेत दिसणार आहे.
महाराष्ट्राची हास्यजत्रा या शोनंतर गौरवला चला हवा येऊ द्या शोबद्दल विचारण्यात आलं होतं. तेव्हा अभिनेत्याने सगळ्यात आधी याबद्दल कोणाला सांगितलं होतं? तसंच या शोसाठी अभिनेत्याला कोणी काय सल्ला दिला होता. याबद्दल गौरवने नुकत्याच एका मुलाखतीत सांगितलं आहे.
याबद्दल लोकमत फिल्मीला दिलेल्या मुलाखतीत गौरव म्हणाला, “चला हवा येऊ द्या या शोसाठी माझी मीटिंग झाल्यानंतर मी त्यांना सांगितलं की, मी नुकताच ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कार्यक्रम सोडला आहे. आता मी थोडा काळ आराम करेन. कारण तो शो तेव्हा चालू होता. युट्यूबला त्याचे काही भाग दाखवत होते. सोशल मीडियावरही मी दिसत होतो. तर मी थोडा वेळ घेईन. त्यावर तेही असं म्हणाले की, ठीक आहे. आमच्याकडेसुद्धा वेळ आहे आणि तुसुद्धा थोडा वेळ घे.”
गौरव मोरे इन्स्टाग्राम पोस्ट
यानंतर तो म्हणतो, “मग मी माझा माझा विचार केला. काही लोकांशी चर्चासुद्धा केली. विशाल देवरुखकर सर, निखिल चव्हाण, अभिनय बेर्डे यांना सांगितलं. तसंच सिद्धार्थ जाधव सरांनासुद्धा मी या शोबद्दल सांगितलं. मी आत्ताच मी हास्यजत्रा शो सोडला आहे आणि सोशल मीडियावर लोकांच्या शिव्या सुद्धा खाल्ल्या आहेत. काही लोकांनी प्रेमही केलं. त्यामुळे मी यातून थोडा वेळ आराम करतो. हेही मी त्यांना बोललो. त्यादरम्यान दोन वर्षांचा काळ गेला. मग असं वाटलं की आता पुन्हा शो करु. कारण दोन वर्षे खूप मोठा काळ होता. तेव्हा मग मी माझ्या काही जवळच्या लोकांना याबद्दल सांगितलं. तेव्हा त्यांना असं म्हटलं की, प्रोमो, एखादा फोटो किंवा वाहिनीकडून अधिकृतरित्या काही समोर येत नाही. तोपर्यंत कुणाला काही सांगणार नाही. पण तुम्हाला सांगतोय.”
यानंतर गौरवने सिद्धार्थ जाधवची काय प्रतिक्रिया होती? याबद्दल असं म्हटलं, “सिद्धार्थ जाधव सरांनी मला बिनधास्त कर. मजा कर… तिकडे पण मजा करशील मला गॅरंटी आहे. मी आहे… असं म्हटलं होतं. तर ‘मी आहे’ असं म्हणणारा कोणी असेल तर बरं वाटतं, त्यात सिद्धार्थ जाधव सर आपल्याला असं म्हणत असतील तर अजून वेगळाच आत्मविश्वास येतो.” दरम्यान, ‘चला हवा येऊ द्या’चं आगामी नवीन पर्व येत्या २६ जुलैपासून सुरू होणार आहे.