Gaurav More Talks About Maharashtrachi Hasyajatra Comeback : ‘फिल्टरपाड्याचा बच्चन’ गौरव मोरे ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या शोमुळे घराघरांत लोकप्रिय झाला. त्याचे अतरंगी डॉयलॉग, हटके विनोदीशैली आणि दमदार अभिनयाचे महाराष्ट्रभरात चाहते झाले आहेत. मात्र, २०२४ मध्ये अभिनेत्याने अचानक ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या शोमधून एक्झिट घेतली होती. गौरवच्या एक्झिटनंतर त्याचे चाहते प्रचंड नाराज झाले होते. आजही अनेकजण गौरवला या शोमध्ये प्रचंड मिस करतात.
आता गौरव मोरे एका नव्या रुपात प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी पुन्हा एकदा सज्ज झाला आहे. अभिनेत्याची गँगलीडर म्हणून ‘चला हवा येऊ द्या’च्या नव्या पर्वात एन्ट्री झालेली आहे. नवीन शो सुरू होण्यापूर्वी गौरवने ‘लोकमत फिल्मी’ला मुलाखत दिली. यावेळी त्याला हास्यजत्रेत कमबॅक करणार का? याबद्दल विचारण्यात आलं होतं. गौरव याविषयी काय म्हणालाय पाहुयात…
गौरव मोरे हास्यजत्रेत पुन्हा परण्याविषयी म्हणाला, “आता कठीण आहे जरा कारण, आता मी इथे ( चला हवा येऊ द्या ) काम करतोय त्यामुळे कठीण आहे. माझी ओळख, माझं नाव सगळं हास्यजत्रेमुळे झालं. हास्यजत्रेतील गौरव मोरे ही माझी ओळख कधीच पुसली जाणार नाही. ते कायम माझ्याबरोबर राहणार…पण, काय असतं आपलं काम आहे… थोडं वेगळं काहीतरी करायला आपण दुसरीकडे जातोच म्हणून मी इकडे आलो. आता मला पाहिल्यावर फिल्टरपाड्याचा बच्चन असं म्हणतात ही ओळख सुद्धा कधीच पुसली जाणार नाही.”
यानंतर अभिनेत्याला सिनेमाच्या प्रमोशनसाठी हास्यजत्रेत पुन्हा जाशील का? असा प्रश्न विचारण्यात आला यावर अभिनेत्याने हसत-हसत उत्तर दिलं. तो म्हणाला, “आता आपल्याकडे आहे ना चला हवा येऊ द्या…”
दरम्यान, ‘चला हवा येऊ द्या’च्या नव्या पर्वात गौरव पाच गँगलीडर्सपैकी एक असणार आहे. हा शो २६ जुलैपासून शनिवार आणि रविवार रात्री ९ वाजता ‘झी मराठी’ वाहिनीवर प्रसारित केला जाईल. आता या नव्या सीझनला चाहते कसा प्रतिसाद देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
गौरवसह श्रेया बुगडे, भारत गणेशपुरे, कुशल बद्रिके, प्रियदर्शन जाधव हे या शोमध्ये गँगलीडर्स असतील. तर, अभिजीत खांडकेकर यंदाच्या पर्वाचं सूत्रसंचालन करणार आहे.