Reshma Shinde Celebrated First Ganesh Festival With Husband After Marriage : गणेशोत्सव सगळ्यांच्याच आवडीचा सण असतो. त्यात नवविवाहित जोडप्यांसाठी तर अजून खास असतो. मराठी इंडस्ट्रीतील अनेक सेलिब्रिटी कपल यंदा लग्नानंतरचा पहिला गणेशोत्सव साजरा करत आहेत. अशातच ‘घरोघरी मातीच्या चुली’ फेम रेश्मा शिंदेनेही यानिमित्त पोस्ट केली आहे.

‘घरोघरी मातीच्या चुली’ मालिकेत जानकी ही भूमिका साकारणारी अभिनेत्री रेश्मा शिंदे मालिकेत जशी सण उत्सव साजरा करताना दिसते, तशीच ती खऱ्या आयुष्यातही सण साजरे करत असते हे तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर असलेल्या फोटोंमधून कळतं. अशातच आता अभिनेत्रीने नवऱ्याबरोबरचे पारंपरिक लूकमधील फोटो शेअर केले आहेत. यावेळी तिने पोस्टला “लग्नानंतरचा पहिला बाप्पा.. पहिलं पावन आगमन आनंद, श्रद्धा आणि नव्या सुरुवातीचा मंगलमय क्षण मोरया” अशी कॅप्शन दिली आहे.

रेश्मा शिंदेने घरच्या बाप्पासाठी केली खास आरास

रेश्मा यंदा तिच्या लग्नानंतरचा पहिला गणेशोत्सव नवऱ्याबरोबर साजरा करत आहे. यानिमित्त तिच्या घरीसुद्धा बाप्पाचं आगमन झालेलं पाहायला मिळतं. घरच्या बाप्पासाठी त्यांनी केळीची पानं व फुलांची आरास केली आहे. यावेळी तिने छान साडी नेसली असून तिच्या नवऱ्यानेही सोवळं परिधान केल्याचं दिसतं.

रेशमाच्या घरी मराठी व दाक्षिणात्य अशा दोन्ही पद्धतीने सणवार साजरे होत असतात. अनेकदा ती सणांच्या दिवशी नवऱ्याबरोबरचे फोटो शेअर करत असते. काही दिवसांपूर्वी लग्नानंतरच्या पहिल्या वटपौर्णिमेनिमित्त तिने नवऱ्याबरोबरचे पारंपरिक लूकमधील फोटो पोस्ट केले होते.

रेश्माने २९ नोव्हेंबर २०२४ रोजी पवनसह लग्नगाठ बांधली होती. दोघांचा प्रेमविवाह असून त्यांनी आधी मराठमोळ्या पद्धतीने व नंतर दाक्षिणात्य पद्धातीने अशा दोन्ही पद्धतीने लग्न केलं. त्यावेळी दोघांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल झाले होते. रेश्माने थेट तिच्या केळवणाचे फोटो पोस्ट करत तिच्या चाहत्यांना सुखद धक्का दिला होता.

दरम्यान, रेश्मा सध्या ‘स्टार प्रवाह’वरील ‘घरोघरी मातीच्या चुली’ या मालिकेत मुख्य नायिकेची भूमिका साकारत असून यामध्ये इतरही अनेक लोकप्रिय कलाकार पाहायला मिळतात. १८ मार्च २०२४ रोजी ही मालिका सुरू झाली असून गेल्या दीड वर्षांपासून ही मालिका प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे.