GharoGhari Matichya Chuli Serial Complited 500 Episodes : ‘घरोघरी मातीच्या चुली’ ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे. ‘स्टार प्रवाह’वरील या लोकप्रिय मालिकेने अलीकडेच टीआरपीमध्येही बाजी मारलेली पाहायला मिळाली.अशातच आता अभिनेत्री रेश्मा शिंदेची मुख्य भूमिका असलेली ‘घरोघरी मातीच्या चुली’ मालिकेचे नुकतेच ५०० भाग पूर्ण झाले आहेत. यानिमित्त मालिकेचा निर्माता सोहम बांदेकरने याबद्दल प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
सोहमने सोशल मीडियावर पोस्ट करत मालिकेला ५०० भाग पूर्ण झाल्यानिमित्त सगळ्यांचे आभार मानले आहेत. त्याने इन्स्टाग्रामवर “सगळ्यांचे खूप आभार, या शोसाठी सगळ्यांनी घेतलेली मेहनत आणि परिश्रम याचं हे फळ आहे” असं म्हणत प्रतिक्रिया दिली. यावेळी त्याने मालिकेतील कलाकारांनाही टॅग केलं आहे. सोहम या मालिकेचा निर्माता असल्याने अनेकदा याबद्दल सोशल मीडियावर पोस्ट करताना दिसतो. ‘स्टार प्रवाह’ वाहिनीच्या सोशल मीडिया पेजवरही ‘घरोघरी मातीच्या चुली’ मालिकेने ५०० भाग पूर्ण केल्यानिमित्त पोस्ट शेअर करण्यात आली आहे.
गेल्या आठवड्यात ‘घरोघरी मातीच्या चुली’ मालिकेने टीआरपीतही बाजी मारत दुसरं स्थान मिळवलं होतं, त्यामुळे सध्या या मालिकेला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याचं पाहायला मिळतं. ‘घरोघरी मातीच्या चुली’ मालिकेत रेश्मा शिंदे, सुमित पुसावळे, प्रतीक्षा मुणगेकर, सविता प्रभुणे, आरोही सांभरे, ऋतुजा कुलकर्णी, आशुतोष पत्की हे कलाकार महत्त्वपूर्ण भूमिकांत पाहायला मिळतात. यामध्ये रेश्मा व सुमित साकारत असलेल्या जानकी-ऋषिकेश या जोडीला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळताना दिसतो.
‘स्टार प्रवाह’वरील ‘ठरलं तर मग’ ही लोकप्रिय मालिका जी गेल्या अडीच वर्षांपासून टीआरपीच्या शर्यतीत अव्वल स्थानावर आहे, त्याची निर्मितीदेखील ‘सोहम प्रोडक्शन’नेच केली असून सुचित्रा बांदेकर व आदेश बांदेकर यांच्या निर्मिती संस्थेची निर्मिती असलेल्या या दोन्ही मालिका मराठी मालिकाविश्वातील लोकप्रिय मालिकांपैकी आहेत.
दरम्यान, घरोघरी मातीच्या चुली’ ही मालिका १८ मार्च २०२४ रोजी सुरू झालेली. आता या मालिकेला सुरू होऊन जवळपास दोन वर्ष होत आली आहेत. गेल्या दीड वर्षांत या मालिकेत अनेक नवनवीन ट्विस्ट प्रेक्षकांना पाहायला मिळाले.