Gharoghari Matichya Chuli Twist: ‘घरोघरी मातीच्या चुली’ या मालिकेत सध्या नवनवीन ट्विस्ट येत असल्याचे पाहायला मिळत आहे. नानांना कोणी किडनॅप केले होते, याचा गेल्या काही दिवसांपासून शोध सुरू होता. जानकीच्या हाती असा पुरावा मिळाला, ज्यामध्ये ऐश्वर्याचे वडील सयाजीराव नानांना किडनॅप करण्यासाठी सांगत असल्याचे दिसले.
ऐश्वर्याच्या वडिलांचे सत्य समोर आल्यानंतर जानकी, हृषिकेश व सौमित्र यांनी पोलिस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांना पुरावा दाखवला. त्यानंतर पोलिसांनी सयाजीरावांना अटक केली. आता मात्र मालिकेत पुन्हा ट्विस्ट येणार असल्याचे समोर आलेल्या प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे.
स्टार प्रवाह वाहिनीने सोशल मीडियावर ‘घरोघरी मातीच्या चुली’ या मालिकेचा प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये पाहायला मिळते की, कोर्टात सयाजीरावांच्या केसची सुनावणी सुरू आहे, सयाजीरावांवर नानांना किडनॅप केल्याचा आरोप आहे. ऐश्वर्या साक्ष देण्यासाठी कोर्टात गेली आहे. ऐश्वर्या न्यायाधीशांसमोर म्हणते, “माझ्या डॅडांवर आमच्या नानांना किडनॅप करण्याचा जो आरोप लागला आहे तो खरा आहे.” लेकीचे हे बोलणे ऐकताच सयाजीराव संतापाने ऐश्वर्या म्हणून ओरडतात. पण, ऐश्वर्या तिचे बोलणे सुरू ठेवते. ती पुढे म्हणते, “या सगळ्यामागे माझ्या डॅडांचा हात आहे.”
याच प्रोमोमध्ये पुढे पाहायला मिळते, सारंग ऐश्वर्याला घेऊन घरी आला आहे. तो घरच्यांना समजावत म्हणतो, “स्वत:च्या डॅडांविरोधात साक्ष देऊन ऐश्वर्याने हे सिद्ध केलंय की ती या परिवाराची सून आहे.” यावर जानकी म्हणते, “जी मुलगी आपल्या वडिलांची होऊ शकत नाही, ती आपल्या परिवाराची काय होणार?” हा प्रोमो शेअर करताना स्टार प्रवाह वाहिनीने, “ऐश्वर्या सयाजीरावांविरोधात कोर्टात साक्ष देणार…”, अशी कॅप्शन दिली आहे.
नेटकरी काय म्हणाले?
घरोघरी मातीच्या चुली मालिकेचा प्रोमो पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. नेटकऱ्यांनी कमेंट्स करीत जानकीचे म्हणणे बरोबर असल्याचे म्हटले आहे. एका नेटकऱ्याने लिहिले, “जानकीचं बरोबर आहे.” आणखी एका नेटकऱ्याने लिहिले, “जानकीने हुशारी दाखवली आहे, बाकीच्यांनीसुद्धा दाखवावी, ऐश्वर्याला घरात घेऊ नये; नाहीतर ही ऐश्वर्या पुन्हा कारस्थान करेल.” एका नेटकऱ्याने लिहिले, “आम्ही जानकीच्या बरोबर आहोत.” “त्या सारंगचे डोळे कधी उघडणार काय माहीत”, असे लिहित एका नेटकऱ्याने त्याच्या भावना व्यक्त केल्या आहेत.




मालिकेत दाखविल्याप्रमाणे, ऐश्वर्या तिच्या वडिलांच्या मदतीने कट कारस्थान करताना दिसते. जानकीने अनेकदा तिचे कारस्थान उघड केले आहे. तिला घराबाहेरही काढले आहे. मात्र, तरीही ऐश्वर्याचा पती सारंग नेहमी तिच्या बाजूने इतरांशी भांडताना दिसतो. आता मालिकेत पुढे काय होणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.