Gharoghari Matichya Chuli upcoming twist: ‘घरोघरी मातीच्या चुली’ या मालिकेत सतत काही ना नवीन घडताना दिसते. जानकी व ऋषिकेशला त्रास देण्यासाठी ऐश्वर्या सातत्याने कटकारस्थाने करत असते.
काही दिवसांपूर्वी ऐश्वर्याने लता या महिलेला ऋषिकेशची आई बनवून घरी आणले होते. त्यामुळे घरात मोठा गोंधळ निर्माण झाला होता. गैरसमज झाले होते. ती ऋषिकेशची आई नाही, हे सिद्ध करण्यासाठी जानकीने अनेक प्रयत्न केले.
खरे तर लता ही ऋषिकेशची नाही; जानकीची आई आहे, हे तिच्याकडे असलेल्या फोटोवरून समजते. जेव्हा हे सत्य ऐश्वर्याला समजते, तेव्हा ते सत्य लपवण्यासाठी ती अनेक प्रयत्न करताना दिसते. त्यामध्ये तिचा पती तिला साथ देतो.
‘घरोघरी मातीच्या चुली’ मालिकेत पुढे काय होणार?
आता स्टार प्रवाह वाहिनीने सोशल मीडियावर घरोघरी मातीच्या चुली मालिकेचा एक प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये पाहायला मिळते की, जानकी व लता या मंदिराच्या परिसरात आहेत. जानकी लतासमोर फाटलेला फोटो जोडत म्हणते की, हा फोटो तुमच्याकडे कसा आला? त्यावर लता म्हणते, “या फोटोत तुझ्याबरोबर मी आहे. मी तुझी आई आहे. मधुभाऊंच्या आश्रमात मी तुला सोडून गेले होते.” लताचे हे शब्द ऐकून जानकी भावूक होते. ती लताला आई म्हणून मिठी मारते.
प्रोमोमध्ये पुढे पाहायला मिळते की, जानकी घरी येते. ती हृषिकेशला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करते. तिथे ऐश्वर्यादेखील असते. जानकी आनंदाने हृषिकेशला म्हणते, “मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे…”, तोपर्यंत दारात पोलीस येतात. ते म्हणतात की, मिसेस जानकी रणदिवे लताबाईंच्या खुनांतर्गत आम्ही तुम्हाला अटक करीत आहोत. ते ऐकल्यानंतर जानकीला धक्का बसतो. ती खून?, असे म्हणते. पोलीस तिला हातात बेड्या घालून गाडीमधून घेऊन जातात.
याचदरम्यान, हृषिकेश तिथे येतो. तो तिला म्हणतो, “जानकी पोलिसांकडे साक्षीदार असेल; पण तू निर्दोष आहेस, यावर माझा विश्वास आहे.” त्यानंतर पोलिसांच्या गाडीबरोबर हृषिकेशदेखील जाताना दिसत आहे. आता हा प्रोमो शेअर करताना स्टार प्रवाह वाहिनीने, ‘इतक्या वर्षांनी जी आई भेटली, तिच्याच खुनाचा आरोप येणार जानकीवर’, अशी कॅप्शन दिली आहे.
नेटकरी काय म्हणाले?
हा प्रोमो पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी कमेंट्स केल्या आहेत. “असं नका करू यार जानकी आणि तिच्या आईच बॉण्डिंग दाखवा”, “अरे काय चाललंय? तोचतोचपणा सुरू आहे. आतापर्यंत नानाचं प्रकरण चालू होतं. परत आता लताबाई मग सुमित्राबाई. यामुळे घरातले म्हातारी लोकं जिवंत राहतील का?”, “जानकीचा वनवास कधी संपणार? स्टार प्रवाह माझी एकच विनंती आहे की, या मालिकेत काहीतरी सकारात्मक दाखवा. कारण- नकारात्मक बघून कंटाळा आला आहे.”




“त्या ऐश्वर्याचं काहीतरी करा. सगळं करूनसुद्धा ऐश्वर्याचं कारस्थान कोणालाच कळत नाही”, “आता बोगसपणाची हद्द झाली. सुरुवातीला मालिका छान होती. हळूहळू मालिकेतील स्पार्क निघून गेला. निर्मात्यांना हे कळायला हवं”, “जानकीच्या मागे साडेसाती लागली आहे”, “मालिका बघून असं वाटत आहे की, चांगल्याचा जमाना राहिला नाही.”, “असं बघून माणसं वेडी होतील. विनंती आहे की काहीतरी चांगलं दाखवा”, अशा अनेक प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत.

दरम्यान, आता मालिकेत काय होणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.