गेल्या तीन दिवसांपासून मुंबईत सुरु असलेल्या मुसळधार पावसाचा जोर मंगळवारी चौथ्या दिवशीही कायम आहे. सोमवार (१८ ऑगस्ट) रात्रीपासून मुंबईत पावसाच्या जोरदार सरी कोसळत आहेत. त्यातच आज (मंगळवार, १९ ऑगस्ट) पहाटे या पावसाचा जोर आणखीनच वाढला आहे. या अतिमुसळधार पावसामुळे मुंबईतील शाळा आणि महाविद्यालयांनाही सुट्टी जाहीर करण्यात आलीय.
मुसळधार पावसामुळे मुंबईतील सखल भागात पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे रस्ते वाहतुकीवर परिणाम झाल्याचं पाहायला मिळत आहे. शिवाय लोकल ट्रेन्सलाही या पावसाचा फटका बसला आहे. अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. तर रेल्वे रुळावरील पाण्यामुळे अनेक लोकल्स उशिराने आहेत. अनेक चाकरमान्यांनी तुंबलेल्या पावसातून वाट काढली आहे.
सामान्य नागरिकांप्रमाणेच मनोरंजनसृष्टीतील अनेक कलाकारांनासुद्धा आजच्या तुफान पावसाचा फटका बसला आहे. अनेक कलाकारांनी सोशल मीडियाद्वारे चाहत्यांना सतर्क राहण्याचे आवाहन केलं आहे. अशातच लोकप्रिय अभिनेता मंदार जाधव आणि अभिनेत्री गिरिजा प्रभू यांनी गुडघाभर पाण्यातून वाट काढत सेट गाठला आहे. आजच्या पावसामुळे कलाकारांनीही तुंबलेल्या पाण्यातून वाट काढत आपल्या कामाचं ठिकाण गाठलं आहे.
मंदार-गिरिजा यांनी सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यात हे दोघे पावसामुळे पूर्ण भिजले असून तुंबलेल्या मान्यांतून मार्ग काढत ते चित्रीकरणासाठी जात आहेत. या तुंबलेल्या पाण्यातून चालत असताना त्यांची झालेली त्रेधातिरपीट या व्हिडीओमधून पाहायला मिळत आहे. मात्र दोघेही या पावसाने तुंबलेल्या पाण्याचा आनंद घेत आहेत. ‘मनोरंजनाला ब्रेक नाही’ असं म्हणत दोघांनी हा व्हिडीओ शेअर केला आहे.
त्याचबरोबर ‘शो मस्ट गो ऑन’ असा हॅश्टॅगही त्यांनी या व्हिडीओला दिला आहे. त्यांच्या या कृतीचं चाहत्यांनी कौतुक केलं आहे. भरपावसात प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी त्यांनी सेटवर खास उपस्थिती लावल्याबद्दल अनेकजण त्यांचं कौतुक करत आहेत, तर काही चाहत्यांनी या कलाकारांप्रती काळजीही व्यक्त केली आहे. तुमच्या मेहनतीला सलाम आहे, पण तुम्ही स्वत:ची काळजी घ्या; अशा प्रतिक्रिया अनेकांनी व्यक्त केल्या आहेत.
मंदार जाधव-गिरिजा प्रभू इन्स्टाग्राम व्हिडीओ
दरम्यान, स्टार प्रवाहवरील ‘कोण होतीस तू काय झालीस तू’ या लोकप्रिय मालिकेतून गिरिजा आणि मंदार प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहेत. त्यांची ही मालिका प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस पडत आहे. शिवाय या दोघांच्या भूमिकांनासुद्धा प्रेक्षकांचं प्रचंड प्रेम मिळत आहे.