Harshada Khanvil Talks About Religious Beliefs : हर्षदा खानविलकर छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री आहेत. आजवर त्यांनी अनेक मालिकांमध्ये काम करून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. सध्या त्या ‘लक्ष्मी निवास’ मालिकेतील त्यांच्या भूमिकेमुळे चर्चेत आहेत. त्यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत धार्मिक स्थळांबद्दल सांगितलं आहे.
हर्षदा या सध्या मालिकेतील लक्ष्मी या त्यांच्या भूमिकेमुळे प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरत आहेत. यातील त्यांचा साधा, सोज्वळ अंदाज प्रेक्षकांची मनं जिंकत आहे. ‘लोकमत फिल्मी’शी बोलताना त्यांनी गणपती बाप्पाबद्दल सांगितलं आहे. तसेच देवावरील त्यांची श्रद्धा आणि धार्मिक स्थळांबद्दल मत व्यक्त केलं आहे.
धार्मिक स्थळांबद्दल काय म्हणाल्या हर्षदा खानविलकर?
हर्षदा खानविलकर म्हणाल्या, “मी गुरुद्वारात जाते, दर्ग्यात जाते, मी चर्चमध्ये जाते, मंदिरातही जाते. मला अशा ठिकाणी जाऊन खूप छान वाटतं. मन शांत वाटतं. त्यामुळे मी अनेकदा जात असते आणि नेहमी यासाठी प्रयत्न करत असते. मी दररोज कुठल्यातरी अशा ठिकाणी जाण्याचा प्रयत्न करते. अगदीच जर कधी उशीर होत असेल, सेटवर यायला किंवा ट्रॅफिकच लागलं असेल तर राहून जातं. नाहीतर रोज मी जातेच आणि दर्शन घेऊन येते.”
हर्षदा पुढे म्हणाल्या, “माझं आणि देवाचं वेगळं नातं आहे. मी त्याच्याकडे कधीच काही मागत नाही असं नाहीये. मी देवाला तू माझं हे काम कर मग मी तुझ्यासाठी असं काही करेन असं सगळं बोलत असते. गणपती बाप्पाबरोबर तर मी खूप संवाद साधत असते की, असं कसं केलंस तू, माझ्याबोरबरच का केलंस वगैरे बोलत असते. बऱ्याचदा माझ्या इच्छा पूर्ण होतात काही वेळेला नाही होत पण तेवढं चालतं”.
हर्षदा खानविलकर याबाबत पुढे म्हणाल्या, “मला असं वाटतं आपलं आई-वडिलांबरोबर जसं नातं असतं, भावा-बहिणीबरोबर जसं नातं असतं तसंच ते नातं असतं. जिथे आपण अपेक्षा ठेवतो, त्यांना सांगतो की मला हे हवंय वगैरे किंवा काही वेळेला त्यांच्याकडून हव्या असलेल्या गोष्टी करुन घेतो. त्यामुळे मला असं वाटतं की जर माझा विश्वास आहे देवांवर तर यात काही चुकीचं नाही मग मला अपेक्षा असतेच की तेही माझ्या ईच्छा पूर्ण करतील.”