Hina Khan : प्रसिद्ध अभिनेत्री हिना खान सध्या तिच्या आयुष्यातील कठीण टप्प्यातून जात आहे. अभिनेत्रीला स्तनाचा कर्करोग झाला असून या आजाराशी ती अगदी हसतमुखाने सामना करत आहे. एवढा गंभीर आजार असतानाही तिने हार मानली नाही. ती या गंभीर आजाराला धैर्याने सामोरी जात आहे. यात तिला तिचा नवरा रॉकी जैस्वालही मदत करत आहे. नुकतंच या दोघांचं लग्न पार पडलं. हिना खान आणि रॉकी जैस्वाल ११ वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये होते.
अशातच ४ जून रोजी या दोघांनी त्यांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत चाहत्यांना सुखद धक्का दिला. हिना आणि रॉकीने अगदी साधेपणाने लग्न केलं आहे. सोशल मीडियावर त्यांनी शेअर केलेल्या फोटोला चाहत्यांनीही चांगलाच प्रतिसाद दिला होता. हिना खान सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. सोशल मीडियाद्वारे ती तिचे अनेक फोटो शेअर करत असते. तसंच तिच्या कर्करोगाबद्दलची प्रत्येक अपडेट चाहत्यांना देत असते.
काही वेळापूर्वी हिनाने तिच्या केसांच्या नवीन लूकचा फोटो शेअर केला होता. अभिनेत्रीने थोड्या वेळापूर्वी तिच्या दोन वेण्यांचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता. त्यानंतर आता हिनाने पती रॉकीचा एक खास व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये हिनाचा नवरा तिची काळजी घेत असल्याचं पाहायला मिळत आहे. याबद्दल हिनाने खास व्हिडीओ शेअर करत नवऱ्याचं कौतुक केलं आहे आणि त्याच्यासाठी कौतुकास्पद पोस्टही शेअर केली आहे.
हिना खानने नवरा रॉकी जैस्वालसाठी शेअर केली कौतुकास्पद पोस्ट
या व्हिडीओमध्ये हिनाचा नवरा रॉकी तिच्या पायांची मालिश करत आहे, याबद्दल हिनाने त्याचं कौतुक करत पोस्ट लिहिली आहे. नवऱ्याचा खास व्हिडीओ शेअर करत हिनाने “फुल देणारा नाही तर फुलासारखं ठेवणारा शोधा” असं म्हटलं आहे. तर या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये तिने त्याच्यासाठी असं म्हटलं आहे, “देवाने कदाचित मला शारीरिक वेदना दिल्या असतील, पण त्याने आत्म्याला शांतीही दिली. रॉकीचा रोजचा दिनक्रम. लवकरच बरी होईन, हो लवकरच…”
दरम्यान, २०१२ पासून हिना खान आणि रॉकी जैस्वाल एकत्र आहेत. हिनाने बर्याचदा तिचे रॉकीबरोबरचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. हिनाची कर्करोगाशी झुंज सुरू असताना रॉकी तिच्यामागे खंबीरपणे उभा आहे. तो प्रत्येक क्षणी तिची काळजी घेताना दिसतो. या व्हिडीओवरही अनेकांनी तशा प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. अनेकांनी या व्हिडीओखाली कमेंट्समध्ये दोघांच्या प्रेमाबद्दल कौतुक केलं आहे.
‘ये रिश्ता क्या कहलाता है’ या मालिकेमुळे हिनाला प्रसिद्धी मिळाली. यामध्ये तिने अक्षराची भूमिका साकारली होती. या मालिकेनंतर ती ‘बिग बॉस’मध्ये सहभागी झाली होती. ‘बिग बॉस’मुळे तिच्या प्रसिद्धीत आणखीनच वाढ झाली. ‘बिग बॉस’नंतर हिना ‘नागिन’ मालिकेतही दिसली होती. यानंतर ती आता लवकरच ‘पती पत्नी और पंगा’मध्ये दिसणार असल्याचं म्हटलं जात आहे.