Hukumachi Rani Hi upcoming twist: मालिकेत येणारे ट्विस्ट प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता निर्माण करताना दिसतात. आपल्या आवडत्या मालिकेत पुढे काय होणार हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षक उत्सुक असतात. आता ‘हुकुमाची राणी ही’ या मालिकेत ट्विस्ट आल्याचे पाहायला मिळत आहे.
‘हुकुमाची राणी ही’ या मालिकेत राणीच्या लग्नाची घाईगडबड चालू असल्याचे पाहायला मिळत आहे. लग्नाआधीचे सर्व कार्यक्रम पार पडले आहेत. मुहूर्तमेढ, मेहंदी आणि हळदीचे विधी जल्लोषात पार पडले. हळदीच्या समारंभात नकळत इंद्राची उष्टी हळद राणीला लागते. यानंतर मुख्य विवाह मुहूर्तावर हुंड्यामुळे राणीचे लग्न मोडते आणि तिच्या कुटुंबाला चारचौघांत अपमान सहन करावा लागतो.
राणीच्या घरच्यांना अपमान सहन करावा लागू नये म्हणून इंद्रा एक मोठा निर्णय घेतो. तो राणीबरोबर लग्न करण्यासाठी तयार असल्याचे सर्वांना सांगतो. इंद्राच्या या निर्णयामुळे सगळ्यांना धक्का बसतो. अखेर राणी-इंद्राचं लग्न थाटात पार पडते. पण, इंद्राचा हा निर्णय महाडिक कुटुंबाला मान्य नाही.
नुकत्याच समोर आलेल्या प्रोमोमध्ये इंद्राची आई राणीच्या गृहप्रवेशावेळी राणी सून म्हणून मान्य नसल्याचे सांगते. तांदळाबरोबर ती मापात रॉकेलसुद्धा ठेवते. जेव्हा राणी ते माप ओलांडते, तेव्हा रॉकेल खाली सांडते. त्यावेळी इंद्राची आई म्हणते की, माझ्या मुलाला हिच्याशी संसार करताना पाहू शकत नाही. त्यावेळी इंद्राची आई त्यावर पेटवलेली काडी टाकते, त्यामुळे राणीचा महाडिक कुटुंबातील प्रवास कसा असणार, राणी-इंद्राच्या नव्या नात्याची पुढील वाटचाल कशी असणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
अभिनेत्री वैभवी चव्हाण म्हणाली…
अभिनेत्री वैभवी चव्हाणने ‘हुकुमाची राणी ही’ मालिकेत राणीची भूमिका साकारली आहे. नुकताच तिने मराठी सीरिअल्स ऑफिशिअशी संवाद साधला. मालिकेला मिळत असलेल्या प्रेक्षकांच्या प्रतिसादाबद्दल अभिनेत्री म्हणाली, “मालिका सुरू झाल्यापासूनच राणी-इंद्रा या जोडीचा चाहतावर्ग निर्माण झाला आहे. राणीचं लग्न ठरलं तेव्हा प्रेक्षकांचे मेसेज येत होते, पण हुंडा न दिल्यामुळे राणीचं लग्न मोडतं आणि त्याच वेळी इंद्रा राणीबरोबर लग्न करायला तयार होतो. हा प्रोमो पाहून प्रेक्षक खूप खूश झाले आहेत. प्रेक्षकांचं प्रेम पाहून काम करण्यासाठी नवीन ऊर्जा मिळते.”
पहिल्यांदाच नवरीची भूमिका साकारल्याचेदेखील वैभवी म्हणाली. अभिनेत्री म्हणाली, “अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवल्यापासून पहिल्यांदाच मी नवरी म्हणून बोहोल्यावर चढली आहे. खरंच प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी सर्व कलाकार आणि पडद्यामागील टीमला भरपूर मेहनत घ्यावी लागते. लग्नाचे भाग शूट होत असताना कामाबरोबर आम्ही सुंदर फोटोशूट करत धमाल, मस्ती केली.”
दरम्यान, आता मालिकेत पुढे काय होणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.