Indian Idol Season 15 Grand Finale: लोकप्रिय म्युझिक रिअॅलिटी शो ‘इंडियन आयडल’चं १५ वं पर्व सध्या खूप चर्चेत आहे. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये ‘इंडियन आयडल’चं हे पर्व सुरू झालं होतं, तेव्हा १६ स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. पण, आता ‘इंडियन आयडल’चं १५ वं पर्व अंतिम टप्प्यात येऊन पोहोचलं आहे. श्रेया घोषाल, विशाल ददलानी आणि बादशाह यांच्या परीक्षणासह प्रेक्षकांच्या मतांनी १६ पैकी सहा जण अंतिम टप्प्यापर्यंत पोहोचले आहेत. चैतन्य देवढे, स्नेहा शंकर, शुभोजित चक्रवर्ती, प्रियांशु दत्ता, मानसी घोष व अनिरुद्ध सुस्वरम या सहा जणांमध्ये अंतिम लढत होणार आहे. या सहाजणांपैकी कोण बाजी मारून ‘इंडियन आयडल’च्या १५ व्या पर्वाच्या ट्रॉफीवर नाव कोरणार, हे पाहण्याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. अशातच ‘इंडियन आयडल’च्या १५ व्या पर्वाचा महाअंतिम सोहळा पुढे ढकलला आहे.
रविवार, ३० मार्चला ‘इंडियन आयडल’च्या १५ व्या पर्वाचा महाअंतिम सोहळा पार पडणार होता. या दिवशी ‘इंडियन आयडल १५’चा महाविजेता ठरणार होता, पण ऐनवेळेला कार्यक्रमात मोठा बदल झाला. निर्मात्यांनी महाअंतिम सोहळा पुढे ढकलला. याबाबत सूत्रसंचालक आदित्य नारायणने घोषणा केली. याचा प्रोमो ‘सोनी टीव्ही’च्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर पोस्ट करण्यात आला आहे.
प्रोमोमध्ये आदित्य नारायणसह परीक्षक दिसत आहेत. पण, स्पर्धक आणि वाद्यवृंद गायब झालेला पाहायला मिळत आहेत, म्हणून आदित्य परीक्षकांना म्हणतो, “आपण महाअंतिम सोहळा करत आहोत, पण आपले अंतिम फेरीत पोहोचलेले स्पर्धक कुठे आहेत?” तेव्हाच बादशाह विचारतो की, बँडवाले कुठे गेले? नंतर श्रेया घोषाल म्हणते, “अरे हे काय सुरू आहे? कधी स्पर्धक तर कधी वाद्यवृंद गायब होतो.” तितक्यात मागून एक आवाज येतो, “अंतिम फेरीत पोहोचलेले स्पर्धक माझ्याकडे आहेत.” हा आवाज असतो अभिनेत्री नीलम कोठारीचा. नीलम स्पर्धकांना घेऊन येते. त्यानंतर अंतिम फेरीत पोहोचलेल्या सहा स्पर्धकांचा जबरदस्त परफॉर्मन्स पाहायला मिळत आहे. शेवटी आदित्य नारायण जाहीर करतो की, ‘इंडियन आयडल १५’चा महाअंतिम सोहळा एका आठवड्यासाठी पुढे ढकलण्यात आला आहे. याचाच अर्थ आता ‘इंडियन आयडल १५’चा महाअंतिम सोहळा ६ एप्रिलला पार पडणार आहे आणि अखेर विजेता जाहीर होणार आहे.
Ek shaandaar shaam, ek dhamakedar entry! ✨ an evening filled with laughter, joy and tussle of talent! ❤️
Dekhiye Indian Idol aaj raat 8:30 baje, sirf #SonyEntertainmentTelevision par aur Sony LIV par@shreyaghoshal @Its_Badshah @VishalDadlani @FremantleHQ #SonyTV… pic.twitter.com/evdLBSDRVZThis quiz is AI-generated and for edutainment purposes only.— sonytv (@SonyTV) March 29, 2025
दरम्यान, ‘इंडियन आयडल’च्या १५ व्या पर्वाचा महाअंतिम सोहळा पुढे ढकलल्यामुळे प्रेक्षकांना आनंद झाला आहे. प्रोमोवर एका नेटकऱ्याने लिहिलं, “अजून एक आठवडा ‘इंडियन आयडल’ पाहता येणार… देवा तुझे खूप आभारी आहे,” तर दुसऱ्या नेटकऱ्याने लिहिलं, “चैतन्य देवढेच विजेता होणार, बघत राहा.” तसंच तिसऱ्या नेटकऱ्याने लिहिलं, “मानसी ‘इंडियन आयडल १५’ची विजेती व्हायला पाहिजे.”