मराठमोळा अभिजीत सावंत इंडियन आयडलच्या पहिल्या सीझनचा विजेता होता. मार्च २००५ मध्ये अभिजीतने हा शो जिंकल्यावर त्याच्या कुटुंबियांचा आनंद गगनात मावत नव्हता. शो जिंकल्यानंतर काही महिन्यांनी त्याने शिल्पाबरोबर साखरपुडा केला होता आणि मग दोन वर्षांनी त्यांनी लग्नगाठ बांधली होती.

अभिजीत व शिल्पाने हॉटरफ्लायला दिलेल्या मुलाखतीत त्यांच्या लग्नाची आठवण सांगितली. अभिजीत इंडियन आयडल जिंकल्यानंतर त्याची लोकप्रियता खूपच वाढली होती. त्याला भेटता यावं, यासाठी चाहत्यांची तुफान गर्दी असायची. अभिजीतचा चाहतावर्ग इतका मोठा होता की त्याच्या लग्नात २००० हून अधिक लोक न बोलवता आले होते. लग्नात गर्दी नियंत्रणाबाहेर जाऊ नये आणि काही दुर्घटना घडू नये यासाठी गर्दीचे नीट व्यवस्थापन करावे लागले होते. “त्या दिवशीचा गोंधळ मी शब्दात सांगू शकत नाही. जिथे जेवणाची सोय केली होती तिथे खूप गर्दी झालीये हे मला दिसत होतं. आम्हाला १००० लोक अपेक्षित होते, पण तिथे ३००० लोक आले होते,” असं अभिजीत म्हणाला.

फोटो काढण्यासाठी गर्दी

अभिजीतचं लग्न होणार आहे हे आजूबाजूच्या परिसरातील सर्वांना माहीत झालं होतं. कारण लग्नाचं ठिकाण त्याच्या घरापासून जवळ होतं, त्यामुळे बरेच अनोळखी लोकही अभिजीत व शिल्पाला भेटण्यासाठी लग्नात आले होते. “मला माइक घेऊन लोकांना रांगेत उभं राहण्यास सांगावं लागलं, कारण खूपच गोंधळ होता,” असं अभिजीत म्हणाला. तर शिल्पा म्हणाली, “लोक आमच्याबरोबर फोटो काढण्यासाठी स्टेजवर येत होते पण ते कोण होते? आम्हाला माहीत नव्हतं. आम्ही दुपारी १ वाजता स्टेजवर गेलो होतो आणि पहाटे ३:३० वाजता खाली उतरलो.”

अभिजीतचं लग्न ज्याठिकाणी होतं, तिथे बाहेर दोन मोठे टीव्ही लावण्यात आले होते. तसेच शेवटी शिल्पा व अभिजीत तिथून निघून गेलेत, असं दाखवावं लागलं जेणेकरून जास्त लोक आत येणार नाहीत. “आमचं लग्न फिल्मी होतं, कारण लोकांना आत येण्यापासून रोखण्यासाठी आम्हाला कार्यक्रमस्थळाबाहेर काही जण उभे करावे लागले होते,” असं अभिजीत म्हणाला.

अभिजीत आणि शिल्पा दोघेही शाळेत असताना एकमेकांना पहिल्यांदा भेटले होते. ते शेजारीच राहायचे. पण कॉलेजच्या काळात ते एकमेकांच्या प्रेमात पडले. अभिजीत सावंत इंडियन आयडलचा विजेता ठरल्यानंतर त्यांच्या कुटुंबियांनी त्यांचे लग्न लावून दिले.