Chetan Vadnere and Rupali Bhosle on their roles in Lapandaav: मालिका दररोज प्रेक्षकांचे मनोरंजन करतात. मालिकेत येणाऱ्या ट्विस्टमुळे प्रेक्षकदेखील आता आपल्या आवडत्या पात्रांच्या आयुष्यात पुढे काय होणार, याची उत्सुकतेने वाट पाहत असतात. त्यामुळे काही मालिका मोठ्या प्रमाणात गाजतात.

आता स्टार प्रवाह वाहिनीवर लवकरच नशीबवान आणि लपंडाव या दोन नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. दोन्ही मालिकांची स्टार कास्ट आणि समोर आलेले प्रोमो यांमुळे मालिकांविषयी प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता आहे.

“तो जे काही करतो…”

लपंडाव मालिकेत अभिनेता चेतन वडनेरे, रुपाली भोसले आणि अभिनेत्री कृतिका देव प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. रुपाली भोसलेने सरकार हे पात्र साकारले आहे. प्रोमोत दाखविल्याप्रमाणे, सरकार हे पात्र नकारात्मक असल्याचे दिसते. तसेच कृतिका सखी या भूमिकेत दिसणार आहे, तर चेतनने कान्हा ही भूमिका साकारली आहे.

आता चेतनची भूमिका नेमकी कशी असणार, असा प्रेक्षकांना प्रश्न पडला आहे. नुकतीच या कलाकारांनी लोकमत फिल्मीला मुलाखत दिली. या मुलाखतीत या कलाकारांनी त्यांच्या मालिकेबाबत, त्यांच्या पात्रांबाबत वक्तव्य केले आहे. त्यांचे वक्तव्य सध्या लक्ष वेधून घेताना दिसत आहे.

चेतन वडनेरे त्याच्या भूमिकेबाबत म्हणाला, “कान्हाच्या स्वभावाच्या विविध बाजू बघायला मिळू शकतात. त्यात तो थोडासा नकारात्मक सरकारला वाटू शकतो. तो प्रेक्षकांना वाटू नये मी आणि आमची बाकीची टीम घेणार आहे. पण, त्याच्या ज्या गोष्टी आहेत, तो जे काही करतो, वागतो अशा काही गोष्टींचा आधार घेतो की ज्या आदर्श नाहीत. पण, तरी तो त्या परिस्थितीनुसार करतो. त्यामुळे तो नकारात्मक वाटू शकतो. पण, तो मनाने खूप चांगला आहे.”

रुपाली भोसलेला विचारले की की सरकार या तुझ्या भूमिकेत संजना या पात्राची काही शेड असणार आहे का? यावर रुपाली भोसले म्हणाली, “सरकार संजनासारखी अजिबात नाही. सरकार पूर्णत: वेगळी आहे. खूप वेगवेगळ्या पद्धतीच्या भावना सरकारमध्ये आहेत. मालिका पुढे जाईल तसे प्रेक्षकांना कळेल की ही अजिबातच संजनासारखी नाही. तसेच, सरकार तशी का आहे, हेसुद्धा तुम्हाला कळेल.”

दरम्यान, ‘लपंडाव’ ही मालिका १५ सप्टेंबरपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.