Jahnavi Killekar’s New Role : छोट्या पडद्यावर सध्या अनेक नवीन मालिका सुरू होताना दिसत आहेत. यामधून काही प्रसिद्ध कलाकार, तर काही नवीन चेहरे प्रेक्षकांना पाहायला मिळत आहेत. अशातच आता छोट्या पडद्यावरील एका मालिकेमध्ये मराठी मलिकाविश्वातील प्रसिद्ध अभिनेत्रीची एन्ट्री होणार आहे. ‘बिग बॉस’मधून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री जान्हवी किल्लेकर पुन्हा एकदा मालिकेतून महत्त्वपूर्ण भूमिका साकारlताना दिसणार आहे.
‘कलर्स मराठी’ वाहिनीवरील एका मालिकेत जान्हवी किल्लेकरची एन्ट्री होणार आहे. नुकताच वाहिनीच्या सोशल मीडिया पेजवरून हा प्रोमो शेअर करण्यात आला आहे. जान्हवी ‘आई तुळजाभवानी’ या मालिकेतून झळकणार आहे. नुकताच तिचा या मालिकेतील लूक समोर आला आहे.
‘कलर्स मराठी’ वाहिनीने शेअर केलेल्या प्रोमोमधून जान्हवी ‘आई तुळजाभवानी’ मालिकेत मोहिनी हे पात्र साकारणार असल्याचे पाहायला मिळत आहे. वाहिनीने शेअर केलेल्या प्रोमोला ‘मोहाचा मोह, मोहिनीचा पाश भुलवून करते कायमचा नाश, अशी मोहिनी येतेय आपल्या भेटीला’ अशी कॅप्शन देण्यात आली आहे. या व्हिडीओखाली अभिनेत्रीच्या चाहत्यांनी कमेंट्स करीत त्यांच्या प्रतिक्रिया दिल्याचे पाहायला मिळतेय.
‘आई तुळजाभवानी’ या मालिकेबद्दल बोलायचं झालं, तर ही एक पौराणिक मालिका असून, गेल्या वर्षभरापासून ही मालिका सुरू आहे. अशातच आता त्यामध्ये जान्हवी किल्लेकरची एन्ट्री झाल्याने तिचे चाहते तिला नवीन भूमिकेत पाहण्यासाठी उत्सुक आहेत. ‘आई तुळजाभवानी’मधील जान्हवीच्या लूकबद्दल बोलायचं झाले, तर ती मोहिनी हे पात्र साकारत असून त्यामध्ये ती पारंपरिक लूकमध्ये दिसत आहे. तिच्या या लूकने सगळ्यांचे लक्ष वेधले आहे.
जान्हवी ‘आई तुळजाभवानी’ मालिकेत खलनायिकेचे पात्र साकारणार असल्याचे दिसत आहे. यापूर्वीसुद्धा अभिनेत्री या वाहिनीवरील ‘भाग्य दिले तू मला’ मालिकेत सानिया या खलनायिकेच्या भूमिकेतून झळकली होती. या मालिकेत अभिनेत्री निवेदिता सराफ, विवेक सांगळे व तन्वी मुंडले महत्त्वपूर्ण भूमिकांतून झळकले होते. या मालिकेने पूर्ण दोन वर्षे प्रेक्षकांचे मनोरंजन केले होते.
‘भाग्य दिले तू मला’नंतर जान्हवी ‘बिग बॉस’ मराठीच्या पाचव्या पर्वात झळकली होती. यामध्ये ती अंतिम फेरीपर्यंत पोहोचली होती. ‘बिग बॉस’मध्ये जान्हवी कायम चर्चेचा विषय ठरायची. ‘बिग बॉस’नंतर अभिनेत्री ‘स्टार प्रवाह’वरील ‘अबोली’ या मालिकेतून झळकली होती. अशातच आता अभिनेत्री लवकरच एका नव्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.