Jahnavi Killekar Talk’s about Vivek Sangle’s Marriage : विवेक सांगळे सध्या चर्चेत आहे ते त्याच्या नवीन घरामुळे. अभिनेत्याने नुकतंच स्वत:चं आलिशान घर खरेदी केलं आहे. त्यानिमित्त त्याच्या कलाकार मित्र-मैत्रिणींनी त्याच्या नवीन घराला भेट देत, त्याचं कौतुक केलंय. अशातच त्याची सहकलाकार जान्हवी किल्लेकरनं नुकतंच अभिनेत्याच्या लग्नाबद्दल सांगितलं आहे.

विवेक सांगळेनं मुंबईत स्वत:चं नवीन आलिशान घर खरेदी केलं आहे. त्यानिमित्त जान्हवी त्याच्या घरी गेली होती. त्यावेळी दोघांनी ‘लोकमत फिल्मी’ला मुलाखत दिली. त्यामध्ये जान्हवीला “विवेकचं घर झालं आहे. आता गृहलक्ष्मीची प्रतीक्षा आहे; तर तुम्ही मैत्रिणींनी त्याच्या लग्नाचा विडा उचलायचं ठरवलं आहे की नाही?” असं विचारण्यात आलेलं.

विवेक सांगळेच्या लग्नाबद्दल जान्हवी किल्लेकरची प्रतिक्रिया

जान्हवी त्याबद्दल म्हणाली, “आम्ही ‘आई माझी काळूबाई’ मालिकेत काम करत होतो तेव्हापासून मी हा विडा उचलला आहे; पण ते शेवटी त्याच्या मनावर आहे. त्यानं सांगावं, जर त्याचं कुठे काही असेल तर.” या मुलाखतीमध्ये जान्हवीनं विवेकचं कौतुक केल्याचंही पाहायला मिळालं.

विवेकबद्दल जान्हवी म्हणाली, “विवेक खूप मेहनती आहे. विवेककडून शिकण्यासारख्या बऱ्याच गोष्टी आहेत. आर्थिकदृष्ट्या गोष्टींचं नियोजन कसं करायचं हे त्याच्याकडून शिकण्यासारखं आहे. ‘भाग्य दिले तू मला’ मालिकेच्या सेटवरही याबद्दल चर्चा व्हायची. तेव्हापासून तो या घराच्या कामात व्यग्र असायचा. त्यामुळे हे घरं घेण्याचं त्याचं स्वप्न पूर्ण झालं आहे. याचा मला खूप आनंद आहे.”

नवीन घराच्या निमित्तानं विवेकची सहकलाकार तन्वी मुंडलेनंही त्याच्या घराला भेट दिली होती. याच मुलाखतीमध्ये तन्वी मुंडलेही होती आणि तिनंही विवेकचं भरभरून कौतुक केलं आहे. तन्वी म्हणाली, “आपल्या सहकलाकाराचं, जवळच्या मित्राचं आज स्वत:चं घर झालं यापेक्षा अभिमानस्पद गोष्ट दुसरी काय असणार आहे. हे त्याचं दुसरं की तिसरं घर असेल; पण मुंबईत घर घेणं इतकी सोपी गोष्ट नाहीये. लालबागसारख्या ठिकाणी त्यानं स्वत:च्या बळावर कोणाचीही मदत न घेता वा घरच्यांकडून पैसे न घेता घर खरेदी केलं आहे. त्यामुळे मला त्याचं कौतुक आहे.”

तन्वी पुढे म्हणाली, “‘भाग्य दिले तू मला’ मालिकेच्या सेटवर विवेक अनेकदा या घराच्या कामानिमित्त फोनवर बोलायचा. त्याचे आणि माझे सतत एकत्र सीन असायचे. तेव्हा अनेकदा तो घराच्या कागदोपत्री कामांमध्ये व्यग्र असायचा तेव्हा मला वाटायचं की, किती कटकटीचं काम आहे. त्याला यामध्ये एवढं गुंतलेलं पाहून मला असं झालेलं की, असं सगळं असेल, तर मी कधीच स्वत:चं घर खरेदी करणार नाही. पैसे असतील तरी भाड्याच्या घरात राहीन. कारण- ही कटकट वगैरे एवढं मला झेपणार नाही, असं वाटायचं. पण, आज जेव्हा मी बघतीये ना तेव्हा कळतंय की, हे त्याच्या मेहनतीचं फळ आहे.”

विवेकचं कौतुक करत तन्वी पुढे म्हणाली, “त्याला सलाम आहे. आपण जिथे राहिलो, तिथेच घर घेणं आणि मुंबईत घर घेणं सोपी गोष्ट नाही. त्याला आता मलाबार हिल्समध्येही घर घ्यायचं आहे. तो आताच म्हणतोय की, तो पुढच्या दोन-तीन वर्षांत तिथेही घर घेईल. मला आता असं वाटतंय की, तो खरंच तिथेही घर घेईल.” तन्वी पुढे व्यक्त होत म्हणाली, “खरं तर हे शब्दांत नाही सांगता येणार. कारण- ही खूप भावनिक गोष्ट आहे.”