Jai Malhar Fame Devdatta Nage Shared A Post : देवदत्त नागे हे मराठी इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेते आहेत. आजवर त्यांनी अनेक कलाकृतींमध्ये काम केलं आहे. परंतु, ते खऱ्या अर्थाने प्रसिद्धीझोतात आले ते ‘जय मल्हार’ या मालिकेमुळे. अशातच आता त्यांनी या मालिकेदरम्यानची आठवण सांगितली आहे.

देवदत्त नागे सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असतात. त्यामार्फत ते त्यांच्या कामासंबंधित अपडेट तसेच खासगी आयुष्यातील काही महत्त्वाच्या गोष्टींबद्दल चाहत्यांना माहिती देत असतात. अलीकडेच ते चर्चेत आले ते त्यांच्या नवीन घराच्या बातमीमुळे. देवदत्त यांनी काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करीत त्यांच्या नवीन घराचं काम पूर्ण झाल्याची आनंदाची बातमी दिली होती.

देवदत्त यांनी आता नुकतीच यासंबंधित एक पोस्ट शेअर करीत मालिकेच्या शूटिंगदरम्यानच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे. त्यांनी इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या पोस्टमधून काही फोटो पाहायला मिळत आहेत. त्यामध्ये त्यांनी जेजुरी येथील त्यांचे काही फोटो पोस्ट केलेले दिसतात. या फोटोंना त्यांनी कॅप्शनही दिली आहे. त्यामधून ते म्हणाले, ” ‘जय मल्हार’चा पहिला भाग १८ मे २०१४ मध्ये प्रदर्शित झाला होता आणि माझा श्री खंडेरायांप्रति एक अलौकिक प्रवास सुरू झाला.”

अभिनेते पुढे म्हणाले, “मनात येईल तेव्हा श्री खंडेरायांच्या, म्हाळसाआई, बानूआईच्या दर्शनाला जायचो आणि आशीर्वाद घ्यायचो हा नियम होता. रात्री ११ला पॅकअप व्हायचं आणि तिथेच सेटवरू स्नान करून लगेच गाडीला स्टार्टर मारून थेट माझी जेजुरी गाठायचो. मध्यरात्री साधारण ३ वाजता पोहोचायचो. मग ५-५:३० पर्यंत रस्त्यावरच गाडीमध्ये बसुन राहायचो. त्यानंतर श्री खंडोबाचं दर्शन आणि मग परतीचा प्रवास करायचो.”

देवदत्त नागे पुढे आठवण सांगत म्हणाले, “श्री खंडोबाची प्रेमळ ओढ त्या दिवसांपासून अगदी आजपर्यंत तशीच आहे. गेली तीन-चार वर्ष वाटायला लागलं होतं की, तिथेच आपलं एक छोटंसं घर असावं; पण माझ्यासाठी हा खूप मोठा निर्णय होता. एक दिवस बारामतीहून जेजुरीकडे जाताना त्या पुलावरून सहज लक्ष गेलं, तिथे काही प्लॉटिंग्स होते. त्या जागेवर जाऊन बघितलं, तर तिथून श्री खंडेरायांच्या जेजुरी गडाचं मनमोहक दर्शन घडलं. त्या दिवशी मित्र परिवारातील एका मित्राच्या दुकानाचं उदघाटन आटोपलं आणि माझा मित्र युवराजने सुचवलेल्या एका ठिकाणी मध्यरात्री राहिलो. पहाटे जाग आली, तेव्हा सहज त्या खिडकीतून लक्ष गेलं, तर समोर साक्षात जेजुरी गड आणि श्री खंडेरायांचं अलोकिक दर्शन. तेव्हाच जेजुरीमध्ये मानत येईल तेव्हा आणि जमेल तेव्हा वास्तव्य करायचं पक्क केलं.”

देवदत्त याबद्दल सांगताना पुढे म्हणाले, “सोन्याच्या जेजुरीमध्ये माझी बहीण सौ. अमृताताई आणि भावोजी श्री. संदीपजी घोणे यांच्या शुभ हस्ते आमच्या नवीन जागेचं भूमिपूजन केलं. तेव्हा आमचे डीलर डॉ. राजेश साठेसुद्धा उपस्थित होते. ते या उपयुक्त जागेसाठी ब्रँड अॅम्बेसॅडर शोधत होते आणि त्यांनी मला त्यासाठी विनंती केली. मी सुरुवातीला प्रांजळपणे नकार दिला; पण माझे जेजुरीचे जवळचे मित्र कन्हैया आणि प्रथमेश या दोघांनी डॉ. राजेश साठे खरंच चांगली व्यक्ती आहेत आणि त्यांच्यासाठी ब्रँड अॅम्बेसॅडर म्हणून काम करण्याचं सुचवलं.”

अभिनेते पुढे म्हणाले, “अशा प्रकारे श्री खंडेरायांच्या आशीर्वादानं माझं जेजुरीमध्ये घर होत आहे आणि जिथे माझं घर उभारत आहे, त्या पवित्र जागेचं ब्रँडिंगही मीच हाताळत आहे. गेली १२ वर्षं मी न चुकता जेजुरीला श्री खंडेरायांच्या दर्शनाला येतोय. श्री खंडेरायांच्या चरणी माझी सेवा ते रुजू करून घेत आहेत त्याचंच हे फलित आहे, असं मला वाटतं. माझ्या जेजुरीतील मित्रांचे, कुटुंबाचे माझ्यावर असणारे प्रेम आणि श्री खंडेरायांची कृपा खरंच अलौकिक आहे.”

अभिनेते पुढे म्हणाले, “आज प्रदर्शित होणारा गोल्डन जेजुरीच्या जाहिरातीचा पहिला व्हिडीओ तुम्हाला आणि श्री खंडेरायांच्या चरणी समर्पित आहे.” जेजुरीमध्ये घर व्हावं, अशी देवदत्त यांची इच्छा होती ती पूर्ण झाली.