नताशा स्टँकोविकचा एक्स बॉयफ्रेंड अली गोनी मागील पाच वर्षांपासून अभिनेत्री जास्मिन भसीनला डेट करतोय. दोघेही रिलेशनशिपमध्ये असून आता लिव्ह इनमध्ये राहत आहेत. जास्मिन व अली दोघांनी अद्याप लग्नाचा निर्णय घेतलेला नाही. पण जास्मिनने तिच्या मनातली इच्छा व्यक्त केली आहे.

जास्मिनला मुलगी दत्तक घ्यायची आहे. तिने स्वतःच इन्स्टाग्रामवर याबद्दल माहिती दिली. जास्मिनने इन्स्टाग्रामवर ‘आस्क मी एनीथिंग’ सेशन ठेवले होते. या सेशनमध्ये तिने चाहत्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं दिली होती. यामध्ये तिने कामाशी संबंधित प्रश्नांबरोबरच वैयक्तिक आयुष्याशी संबंधित प्रश्नांची उत्तरंही दिली.

“तू मुलगी दत्तक घ्यायचं कधी ठरवलंस? हा एक खूप सुंदर विचार आहे,” असं एका चाहत्याने जास्मिनला विचारलं. त्यावर तिने काय उत्तर दिलं ते पाहुयात. “जेव्हा मी घर सोडलं तेव्हा मला जाणवलं की हे किती कठीण आहे. तेव्हाच मी देवाला वचन दिलं होतं की जेव्हा माझं आयुष्य असं बनवेल की मी दुसऱ्या व्यक्तीला सगळ्या सोई-सुविधा देऊ शकेन तेव्हा मी एक मुलगी दत्तक घेईन आणि तिचं संगोपन करेन,” असं जास्मिन भसीन म्हणाली.

पाहा पोस्ट

jasmin bhasin
जास्मिन भसीनची पोस्ट (सौजन्य – इन्स्टाग्राम)

जास्मिनने मुलगी दत्तक घेण्याची इच्छा पहिल्यांदाच व्यक्त केली असं नाही. यापूर्वी ‘बिग बॉस 14’ मध्ये शार्दुल पंडितशी बोलताना तिने लग्न आणि मातृत्वाबद्दल तिचं मत व्यक्त केलं होतं. त्यावेळी लग्न करणं हा आयुष्यातील एकमेव उद्देश नाही, असं ती म्हणाली होती.

“मला लग्न करायचं नाही, असं नाहीये. पण लग्न नाही झालं तरी माझी हरकत नसेल. मला असं लग्न नकोय जे टिकणार नाही. मला लग्नासाठी योग्य जोडीदार भेटला नाही, तरीही माझी हरकत नसेल. आई होणं ही माझी इच्छा आहे, पण ती पूर्णपणे लग्नावर अवलंबून नाही. मला एक मुलगी दत्तक घ्यायची आहे, जिला मी चांगलं आयुष्य देऊ शकेन,” असं जास्मिन म्हणाली होती.

दरम्यान अली गोनी जास्मिन आयुष्यात येण्यापूर्वी हार्दिक पंड्याची एक्स बायको नताशाबरोबर रिलेशनशिपमध्ये होता. त्यांनी एकत्र रिअॅलिटी शोदेखील केला होता. पण काही काळाने त्यांचं ब्रेकअप झालं. नंतर नताशाने हार्दिकशी लग्न केलं, तर अली जास्मिनला डेट करू लागला. नताशा व हार्दिकचा वर्षभरापूर्वी घटस्फोट झाला. या जोडप्याला एक मुलगा आहे.