Kamali fame Ketaki Kulkarni: ‘कमळी’ या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. या मालिकेतील कमळी, हृषी, अनिका, आजी आणि इतर सर्वच पात्रांना प्रेक्षकांची मोठी पसंती मिळताना दिसत आहेत.

कमळी या मालिकेत दाखविल्याप्रमाणे, कमळी ही गावाकडून मुंबईत तिची स्वप्नं पूर्ण करण्यासाठी आली आहे. मात्र, अगदी सुरुवातीपासूनच अनिका व कमळी यांच्यामध्ये खटके उडताना दिसत आहेत.

अनिका सतत कमळीला त्रास देण्यासाठी अनेक प्रयत्न करते. तिचे हट्ट पूर्ण करण्यासाठी तिची आई व आजीदेखील तिला मदत करताना दिसतात. कमळी मुंबईत आल्यापासून ते तिचा कॉलेजमध्ये प्रवेश होईपर्यंत अनिका व तिच्या आजीने तिला प्रचंड त्रास दिला.

कमळीने शहर सोडून पुन्हा तिच्या गावी जावे, यासाठी त्यांनी अनेक प्रयत्न केले.पण, कमळी व तिची जिवलग मैत्रीण टिकून राहिले. त्यांनी येणाऱ्या प्रसंगांना धाडसाने तोंड दिले. हृषीने कमळीला वेळोवेळी साथ दिली. आता कमळी व अनिका यांनी कबड्डीच्या स्पर्धेत भाग घेतला आहे. यादरम्यानदेखील त्यांच्यात वाद झालेले पाहायला मिळाले. लवकरच कमळीची टीम आणि अनिकाची टीम आमने-सामने येणार आहेत.

केतकी कुलकर्णी काय म्हणाली?

आता या मालिकेत अनिका ही भूमिका साकारणारी अभिनेत्री केतकी कुलकर्णीने यावर वक्तव्य केले. केतकीने ‘मराठी सिरिअल्स ऑफिशिअल’शी संवाद साधला. ती म्हणाली, “तयारी जोरात सुरू आहे. आम्ही जवळपास दररोज प्रॅक्टिस करीत आहोत. मी याआधी फारशी कबड्डी खेळलेली नाही; पण आता सराव करत आहे आणि बऱ्याच गोष्टी शिकत आहे.

मी कबड्डीचे नियम शिकले असून, प्रोफेशनल गेमचे व्हिडीओज पाहून अनेक गोष्टी समजून घेत आहे. कुठलाही खेळ असो, स्टॅमिना फार महत्त्वाचा असतो आणि मी त्यावरही काम करीत आहे. वॉर्मअप, वर्कआउट्स, जॉगिंग करते. डाएटचीही काळजी घेते. फक्त या गेमसाठी नाही, तर रोजच मी या गोष्टींची काळजी घेते.

“मी जंक फूड आणि साखर टाळते. सध्या पावसाळा आहे; पण उन्हात खेळताना मी नेहमी स्वतःला हायड्रेट ठेवते. लिंबूपाणी किंवा इलेक्ट्रोलाइट घेत राहते,” असेही तिने सांगितले.

दरम्यान, आता मालिकेतील या ट्रॅकबद्दल प्रेक्षकांमध्ये उत्सुकता आहे. कोणती टीम कोणाला मात देणार, मालिकेत पुढे काय होणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.